फाटक हायस्कूलमध्ये सहावीत शिकणारी स्पृहा होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिची डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत (२०२५-२६) प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या या देश पातळीवरील स्पर्धेत यंदा एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन अहवाल आणि मुलाखत अशा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.
या स्पर्धेमध्ये फाटक हायस्कूलने या वर्षी सुयश मिळवले आहे. सहावीच्या अ तुकडीमध्ये शिकणाऱ्या स्पृहा तेजराज भावे या मुलीने या परीक्षेच्या दोन फेऱ्या उत्तीर्ण केल्या असून, तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी ती निवडली गेली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीतून निवड झालेली ही एकमेव विद्यार्थिनी फाटक हायस्कूलची आहे. या परीक्षेसाठी या स्पर्धेसाठी फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक कीर सर, विज्ञान शिक्षिका सौ. श्रावणी जोशी, प्रयोगशाळा सहायक मुरुडकर सर, कलाशिक्षक नीलेश पावसकर सर यांनी तिला मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. कृती संशोधन प्रकल्पासाठी स्पृहाला रत्नागिरीतील प्रथितयश संशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

या स्पर्धेचे हे ४५वे वर्ष आहे. यंदाच्या स्पर्धेची संकल्पना ‘पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप)’ असा आहे. माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीवर कसे परिणाम होतात याविषयीचा प्रकल्प स्पृहा सध्या तयार करत आहे. तिसऱ्या फेरीसाठी हा कृती संशोधन प्रकल्प तिला सादर करावयाचा आहे. या प्रकल्पावर तिची एक मुलाखत मुंबईत वडाळा इथे १५ मार्चला होणार आहे. मुलाखतीचेही दोन टप्पे असून, एक मुलाखत केलेल्या प्रकल्प विषयावर आधारित असते, तर दुसरी सर्वसाधारण मुलाखत असते.
दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, उपाध्यक्ष ॲड. सौ. सुमिता भावे, ॲड. विनय आंबुलकर, कार्याध्यक्षा सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, तसेच सर्व कौन्सिल सदस्यांनी आणि शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पृहाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply