पणजी : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनातून वेगळा ठसा उमटवलेले संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक-नट पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांचे आज (१७ जून २०२६) करंजाळे-पणजी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गोव्यातील संगीत रंगभूमीमध्ये ख्यातनाम असलेल्या सावकार कुटुंबात १४ डिसेंबर १९२८ रोजी बडोद्यात त्यांचा जन्म झाला होता. मंदारमाला, कट्यार काळजात घुसली यांसारख्या अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ या क्षेत्राची सेवा केली. २००६ साली त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला होता. सावकार यांच्या निधनाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करून आदरांजली अर्पण केली आहे. १८ जून रोजी सकाळी सावकार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांची काही लोकप्रिय गाणी
ऊठ पंढरीच्या राजा
घेई छंद मकरंद
जय गंगे भागीरथी
देवाचिये द्वारीं उभा
नमन नटवरा विस्मयकारा
नारायणा रमारमणा
पतितपावन नाम ऐकुनी
प्रिय न कवण तुजसमान
भरे मनात सुंदरा
भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा
मुरलीधर श्याम हे नंदलाल
योगी पावन मनाचा
रतिहुन सुंदर मदनमंजिरी
रागिणी-मुखचंद्रमा
सप्त सूर झंकारित बोले
सुखवितो मधुमास हा
ही कनकांगी कोण ललना
बसंत की बहार आयी
बुझावो दीप ए सजनी
तारे नही ये तो रातको
सब गुनिजन मिल गावो
सावन घन गरजे बजाये

