तबल्याचा एक ठेका थांबला : मिलिंद टिकेकर यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक, तसेच फाटक प्रशालेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मिलिंद माधव टिकेकर (वय ५२) यांचे आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास पुण्यात निधन झाले.

मिलिंद टिकेकर रत्नागिरीच्या फाटक प्रशालेचे माजी विद्यार्थी होते. ६ जून १९९६ पासून फाटक प्रशालेत ते अध्यापन करू लागले. मराठी आणि भूगोल हे त्यांच्या अध्यापनाचे विषय होते. काही काळ त्यांनी फाटक प्रशालेचीच शाखा असलेल्या कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूलमध्येही अध्यापन केले. ते विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय होते. शाळेत मुलांचे नाटक बसवणे, समूह गीते बसवणे, शाळेचा कार्यक्रम सुनियोजितपणे घडवून आणणे अशा अनेक बाबतीत त्यांचा सहभाग होता. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने टिकेकर सरांनी फाटक प्रशालेसह रत्नागिरीतील सर्व शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना घेऊन कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी गौरव गीत छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सादर केले होते. स्वच्छता अभियानांतर्गत ‘स्वच्छ भारत का इरादा….’ हे गीत त्यांनी शहरातील सात हजार मुलांच्या साथीने प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सादर केले. टिकेकर सरांच्या अध्यापनावर कीर्तन परंपरेची छाप होती. शाळेच्या लांब पल्ल्याच्या सहली आयोजित करणे हा त्यांचा छंद होता. शालेय स्नेहसंमेलनातील अल्पोपाहाराला फूड मॉलची संकल्पना त्यांनी मांडून ती यशस्वीपणे राबवली. शाळेच्या एका तपासणीच्या वेळी टिकेकर सरांनी तालवाद्यांच्या ठेक्यावर मुलांची कवायत करून घेतली होती. ते स्वत: उत्तम तबलावादक होते.

नाट्य क्षेत्रातही त्यांच्या कार्यकौशल्याचा ठसा त्यांनी उमटविला होता. त्यांना संगीत नाटकाचे दिग्दर्शन, तबला वादनासाठी राज्य नाटय पुरस्कारही प्राप्त होते. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे दरवर्षी गर्दीचे उच्चांक मोडणाऱ्या काही कीर्तनांनाही त्यांनी चारुदत्त बुवा आफळे यांना तबलासाथ केली होती. त्यांनी अनेक गायक कलाकारांना तबलासाथ केली होती. अनेक कार्यक्रमांचे यशस्वी संयोजन केले. टिकेकर यांनी अभिनय, दिग्दर्शनातही आपली छाप पाडली होती. काही संगीत नाटकांत भूमिका करण्याबरोबरच त्यांनी दिग्दर्शनही केले होते. राज्य शासनाच्या नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी २०१४ ते २०२० या काळात काम पाहिले होते.

हृदयविकाराच्या उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी ते पुण्याला गेले होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली होती. त्यातून बरे होत असतानाच आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चाात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

हनुमंतासाठी पाट ठेवणारे टिकेकर…

सरांनी फार वर्षांपूर्वी मोठा गीतरामायण कार्यक्रम केला होता, रत्नागिरीच्या खातू नाट्य मंदिरात तो झाला होता. त्यात मी पण एक गायक कलाकार होतो. तो कार्यक्रम सरांनी बसवला होता. त्याची खूप दिवस तालीम आम्ही त्यांच्या घरी केली होती. तालमीच्या वेळीही ते एक पाट रांगोळी काढून ठेवून द्यायचे. ते म्हणायचे की, जिथं गीतरामायण गायलं जातं, तिथे श्री हनुमंत रामस्तुती ऐकायला येतात. सरांची ही आठवण कायम लक्षात राहील, अशा शब्दांत गुरुदेव नांदगावकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply