विद्यार्थिदशेपासूनच नशेपासून दूर राहा - पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव

विद्यार्थिदशेपासूनच नशेपासून दूर राहा – पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहायला शिकायला हवे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अरांक्षा यादव यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाअंतर्गत खातू नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच आपले ध्येय निश्चित करावे. या वयातच योग्य निर्णय घेतलात तर तुमचे आयुष्य चांगले होणार आहे. अनेकदा मित्रमैत्रिणी सांगतात एकदा नशा करून बघ, त्याच वेळी आपण नकार दिला पाहिजे. कारण त्यावेळी होकार दिला तर आपले हे चुकीचे पाऊल तुमचे सर्व आयुष्य वाया घालवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग राहावे, सतर्क राहावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अरांक्षा यादव यांनी नशामुक्तीसंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास पोलिस मुख्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन केले. आपण व्यसन करायचे नाही व आपल्या संपर्कातील लोकांनी करू नये यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. मी मूळची हरियाणाची असून आयपीएस झाल्यावर माझे पहिले पोस्टिंग रत्नागिरीत झाल्याचे यादव म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांची मोठी बहीण असल्याप्रमाणे सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. नशेपासून दूर राहण्याचा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमाला १५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे म्हणाले की, नशा करणे हा आपल्या समस्येवरचा उपाय नसतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपण आपले कुटुंबीय, मित्र मैत्रिणी, शिक्षक किंवा कोणीही जवळच्या व्यक्तीबरोबर संवाद साधून सोडवल्या पाहिजेत. त्यामुळे आपण नशेपासून दूर राहू शकतो.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला.

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीसंदर्भात जनजागृती केली. स्वयंसेवकांनी प्रभावी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण केली व नशामुक्त जीवनाचा संदेश दिला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply