रत्नागिरी : सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असून नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एका विशेष संदेशाद्वारे दिला आहे.
सायबर भामटे विविध मार्गांनी नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आयुष्यभराची कमाई एका क्लिकवर लंपास करत असल्याचे नमूद करून श्री. बगाटे यांनी सांगितले की, सध्याच्या डिजिटल व इंटरनेटच्या युगात प्रत्येकजण मोबाइल आणि ऑनलाइन सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. त्याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगाराकडून घेतला जात आहे.
याबाबत अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल अॅरेस्ट (Digital Arrest) ची भीती: स्वतःला सीबीआय (CBI), कस्टम्स किंवा पोलीस अधिकारी भासवून लोकांवर गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवणे आणि 'डिजिटल अॅरेस्ट'ची धमकी देऊन पैसे उकळणे असे गुन्हे होत आहेत.
बँक खाते बंद होण्याची भीती दाखवून किंवा केवायसीच्या नावाखाली ओटीपी व गोपनीय माहिती मागवून खात्यातील रक्कम पळवणे, महानगर गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे खोटे मेसेज पाठवून बनावट लिंक किंवा ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडणे, घरबसल्या नोकरी किंवा कॅप्चा भरून मोठी कमाई करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणे अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने मिशन रायझिंग फ्लॉवर्स हे विशेष अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, अमली पदार्थविरोधी जनजागृती व स्वसंरक्षणाचे धडे मोठ्या प्रमाणावर दिले जात आहेत.
कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना किंवा अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधताना नागरिकांनी सावध राहावे, कोणालाही आपला ओटीपी, बँक तपशील शेअर करू नयेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी केले आहे.
सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० (1930) किंवा तात्काळ पोलीस मदत ११२ (112), तसेच रत्नसेतू चॅटबॉट: ९८७१४१५६१२ (9871-415612) या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच http://www.cybercrime.gov.in, किंवा mhcyber.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. सायबर गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी नागरिकांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Follow Kokan Media on Social Media

