रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करून यशाची घोडदौड कायम राखली आहे.
ग्राहकांच्या दृढ विश्वास आणि उत्कृष्ठ व विनम्र सेवांच्या जोरावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्धवार्षिक अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२६ अखेर ६००० कोटीचा टप्पा पार केला. बँकेला ४९ कोटी १३ लाख ३६ हजार नफा झाला आहे. त्यामध्ये गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा १० कोटी ७४ लाखाने वाढ झाली आहे.
राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून नावलौकिक असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहक सेवा व आधुनिकतेची वाट धरून डिजिटलायझेशनला विशेष महत्व दिलेले असून बँकेमार्फत NEFT/RTGS, ATM, Mobile Banking,QR Code यांसारख्या सुविधा ग्राहकांना देत असताना जिल्ह्यातील ग्राहकांकरीता बँक काही दिवसात AEPS सुविधा कार्यान्वित करत आहे. अशा प्रकारे AEPS सुविधा ग्राहकांना देणाऱ्या राज्यातील ३ जिल्हा बँकांपैकी रत्नागिरी बँक एक बँक असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत या सुविधेची वाढ होणार आहे.
गतवर्षीपेक्षा बँकेने ठेवी,कर्ज व नफ्यात लक्षणीय वाढ केल्यामुळे बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे,उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालकांनी बँकेचे सभासद, ग्राहक यांना त्यांच्या सहकार्यामुळे झालेल्या व्यवसाय वृद्धीबाबत आभार मानले आहेत.
संचालक मंडळाने घेतलेले अचूक निर्णय व बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बँकेला हे यश प्राप्त झाले आहे, असे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सु धीर गिम्हवणेकर यांनी व्यक्त केले.
Follow Kokan Media on Social Media

