पासष्टावी राज्य नाट्य स्पर्धा-२०२६ १६-११-२०२६

पासष्टावी राज्य नाट्य स्पर्धा-२०२६ : १९-११-२०२६

पासष्टावी राज्य नाट्य स्पर्धा-२०२६, १९-११-२०२६ – लाइफलाइन

पासष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी

दि. १९-११-२०२६

नाटक : लाइफलाइन
संस्था : श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, पाथरट, पाली, ता. रत्नागिरी

श्रेयनामावली
निर्माते : जयप्रकाश पाखरे
लेखक : अनिल काकडे
दिग्दर्शक : ओंकार पंडीत
सहदिग्दर्शक : अमोल मयेकर
नेपथ्य : रामदास मोरे
पार्श्वसंगीत : प्रदीप गणपत कांबळे
रंगभूषा : गजानन नारायण पांचाळ
वेशभूषा : महेश गणपत पाखरे
प्रकाशयोजना : दयानंद प्रकाश चव्हाण
रंगमंच व्यवस्था : मिथिल दळवी, मंदार लिंगायत
सूत्रधार : अनिल कृष्णा धाडवे

भूमिका आणि कलावंत
महादूबाबा : कुलदीप गजानन कुरूप
कबीर : संकेत संतोष साळवी
मुक्ता : सायली शिंदे
दगड १-२ : मनीष मोहन लिंगायत, आदित्य मंगेश पांचाळ
व्यक्ती १-२ : अभिजित अशोक सावंत, संकेत सखाराम पालकर

लाइफलाइन

एका रस्त्यावरील चौकात एक पुतळा अर्धवट भग्न स्थितीत आहे, लोकांची धावाधाव सुरू आहे. पोलिसांच्या गाड्यांचे सायरनचे आवाज, स्त्रियांच्या, लहान मुलांच्या रडण्याचे /ओरडण्याचे आवाज सुरू आहेत. त्या पुतळ्याची कोणी अज्ञातांनी दगड मारून विटंबना केलेली असते आणि त्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे दंगल उसळलेली असते.

स्मशानभूमी व तेथील जळणाऱ्या चिता, लाकडे ठेवण्याची खोली, एक जीर्ण वृक्ष, बाजूला काही फुलझाडे आणि अशा पार्श्वभूमीवर दोन निर्जीव दगड एकमेकांशी बोलते होतात. देवळातल्या मूर्तीही दगडापासूनच बनलेल्या असतात आणि अशा दंगलीमध्येही दगडांचाच वापर हत्यार म्हणून होतो आणि त्यामुळे अनेक निष्पापांचा बळी जातो. काही जखमी होतात, कायमचे अपंग होतात. याचेच शल्य/खंत हे दगड आपापसात बोलून व्यक्त करत असतात.

गावात शहरात धार्मिक, जातीय, वैयक्तिक स्वार्थ, भावनोद्रेकी प्रसंग / घटना घडतात. त्यामुळे दंगली घडतात. त्यामुळे निष्पाप, निरपराध लोकांची कशी फरपट होते, हे मांडण्याचा प्रयत्न निर्जिव दगड व संबंधित पात्रे यांच्या तोंडच्या संवादातून, माणुसकीला पुन्हा जिवंत करण्याच्या प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो.

नाटकाची कथा सलग नसून रंगमंचावर प्रामुख्याने महादूबाबा, कबीर व त्याची प्रेयसी मुक्ता यांच्यासोबत दंगलीमुळे त्यांच्यावर उद्भवलेल्या व त्यांच्या नात्यावर परिणाम करणाऱ्या घटनांचे प्रसंग छोट्या छोट्या प्रवेशातून प्रसंगी फ्लॅशबॅक पद्धतीने दाखवून अखंड नाटक बांधण्यात आलेले आहे.

महादूबाबा स्मशानात चितांमध्ये जळणाऱ्या प्रेतांची विल्हेवाट लावणारा एक कर्मचारी असतो, त्याचेही कुटुंब असते. बायकोमुले असतात. मात्र एक इमारत कोसळल्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाते. फक्त महादू जिवंत राहतो. रद्दीच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करत असतो. ते दुकानही बंद पडते म्हणून तो या स्मशानात कर्मचाऱ्याची नोकरी करत असतो. कबीर हा गावात एक वृद्धाश्रम चालवत असतो. त्याच्या कुटुंबात त्याची आई असते आणि त्याची प्रेयसी मुक्ता, जी एका दवाखान्यात नोकरी करत असते. मुक्ताच्या कुटुंबात तिचे वडील असतात.
कबीर दंगलीमधून जीव वाचवून लपण्यासाठी म्हणून या स्मशानात आलेला असतो, तो घाबरलेला असतो. महादूबाबा त्याची चौकशी करतो, धीर देतो. मग ते एकमेकांविषयी जाणून घेत असतात. महादू चितेवर जळणाऱ्या एकेका प्रेताविषयी कबीरला माहिती सांगतो. दुकानात जायला निघालेले शेठजी व सफाई कामगार, तरुण मुलगी इत्यादींचे मृतदेह चितेवर जळत असताना, महादूबाबा कबीरला सांगतो, स्मशानात मृतदेह आल्यावर त्याची जात, धर्म, श्रीमंती अहंकार, भेदभाव यांच्या सीमारेषा संपतात. मृत्यू हेच अंतिम सत्य राहते.
बराच उशीर झाल्याने महादूबाबा काही खाण्यासाठी मिळते काय, हे पाहायला बाहेर जातो. येताना पिठले-भाकरी घेऊन येतो. मात्र कबीरला आपल्या आईची व मैत्रीण मुक्ताची आठवण येत असते. त्यामुळे त्याला ते अन्न गोड लागत नाही. तो तेथील बाकड्यावर झोपतो.

कबीरला स्वप्नात त्याची मैत्रीण मुक्ता आल्याचा भास होतो व झोपेत तो मुक्ताच्या नावाने हाका मारत असतो. तेवढ्यात त्याला जाग येते. महादूबाबा त्याला विचारतात की, मुक्ता कोण, जिच्या नावाने तू हाका मारत होतास? मग कबीर मुक्ताविषयी महादूबाबाला सांगतो. मुक्ता कबीरची प्रेयसी असते, ते लग्न करणार असतात.
कबीर झोपलेला असताना महादूबाबा रात्री राखण करत असतो. झोपडपट्टीतील काही लोक येतात व चितेतल्या राखेतून मिळणाऱ्या सोन्यासाठी ती गोळा करून चोरून नेतात. महादूबाबा त्यांना रोखतो. त्यावेळी महादूबाबा व त्यांची झटापट होते. त्यात महादूला जखम होते. त्यावर कबीर मलमपट्टी करतो.

काही चिता नीट जळत नसतात. त्यातील एका चितेला वारंवार प्रज्वलित करावे लागत असते, कबीरला ही गोष्ट लक्षातही आलेली असते. तेवढ्यात मुक्ताचे वडील येतात व महादूकडे मृतदेहाच्या अस्थी मागतात, महादू नाव विचारतो त्यावेळी ते ‘मुक्ता माधव’ हे नाव सांगतात. हे ऐकताच कबीरच्या पायाखालची वाळू सरकते, दुर्दैवाने या दंगलीत मुक्ताचाही बळी गेलेला आहे, हे त्याच्या लक्षात येते. आपली शेवटची भेट त्याला आठवते, जी चिता नीट जळत नव्हती ती मुक्ताचीच होती. चितेतूनही ती आपल्याला काही सांगू पाहत होती, असे त्याला वाटते. मुक्ताच्या आठवणीने तो व्याकूळ होतो व स्मशानातून जायला निघतो. महादू त्याला सांगतो, बाहेरची दंगल थांबलेली नाही. तू थोड्यावेळाने जा, मात्र कबीर तेथून निघून जातो.

थोड्याच वेळात दंगलीचा बळी ठरलेला आणखी एक मृतदेह अंतिम संस्कारांसाठी स्मशानात आणला जातो, त्यावेळी कबीर तेथे ‘आत्मा’रूपाने येतो व यापुढे मी येथे स्मशानातच राहणार, असे तो महादूबाबांना सांगू पाहतो. येणाऱ्या मृतदेहाचे सर्व क्रियाकर्म मी करतो. तुम्ही काही करू नका, असे म्हणतो. मात्र महादूला तो दिसत नसतो. मृतदेह कोणाचा आहे हे पाहण्यासाठी महादूबाबा त्यावरील कफन बाजूला करतो तर तो मृतदेह कबीरचाच असतो. महादूबाबाला वाईट वाटते. जाऊ नको बाहेर सांगत असताना तू गेलास आणि आता या जगातूनही गेलास, असा तो आक्रोश करतो.

कबीर आत्मारूपाने तेथेच वावरत असतो, तितक्यात मुक्ताच्या चितेतून तिचाही आत्मा बाहेर येतो आणि ती दोघे ठरवतात. जिथे शांतता असेल, धार्मिक, जातीय, भावातिरेक नसेल अशा माणुसकी, संवेदनाशीलता असलेल्या ठिकाणी आपण जाऊ आणि कबीर-मुक्ताचे आत्मे तेथून निघून जातात.

पुन्हा रंगमंचावर तेच दोन रूपकात्मक दगड येतात. माणुसकी संपल्याने, संवेदनाशीलता नष्ट झाल्यामुळे, राजकारण, समाजकारण, वैयक्तिक स्वार्थ व माणसांच्या श्रद्धेचा / भावनांचा अतिरेक झाल्यामुळे या दंगली घडतात. ज्या दगडामुळे पुतळ्याची विटंबना झाली त्याच दगडामुळे मुक्तासारख्या मुलीचा जीव गेला. यामुळे आता कोणी येथे राहावयास तयार नाही. सगळे देश सोडून चालले आहेत. हे आता थांबलेच पाहिजे, असे ते म्हणतात, येथेच नाटक संपते.

नेपथ्यात स्मशानभूमी व तेथील जिवंत चिता, एक पडकी खोली, जीर्ण वृक्ष, एक बाकडे, छोटी बाग तसेच जिवंत चितांमधील ज्वाला व धूर या प्रकाशयोजनेद्वारे दाखविल्याने परिणामकारकता साधली आहे. काही फ्लॅशबॅक प्रसंगांमध्ये आवश्यकतेनुसार प्रकाशयोजनेद्वारे गंभीरता, दाहकता तसेच कबीर-मुक्ताचे हळवे रोमॅन्टिक प्रसंग रंगवण्यात आले आहेत. पार्श्वसंगीतही काही प्रसंगांत प्रभावीपणे वापरण्यात आले आहे.

(नाट्यावलोकन : प्रसाद वैद्य – ९४२०१ ५५३३३)

तिकिट विक्री
₹ १५ x ७७७ = ₹ ११,६५५/-
₹ १० x १००= ₹ १०००/-

एकूण तिकीट विक्री ₹ १२,६५५/-

प्रेक्षक संख्या – अंदाजे ८७७

पुढचे नाटक (शुक्रवार, दि. २०-११-२०२६)

पितामह उवाच

लेखक – मिलिंद दातार

संस्था – श्री देव सोमेश्वर सुकाई आणि एण्डोमेंट ट्रस्ट

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply