राणी लक्ष्मीबाईंच्या काळात सुरू झालेल्या मालगुंडच्या शाळेत जयंतीचा जागर

मालगुंड (ता. रत्नागिरी) : झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या काळात सुरू झालेल्या येथील शाळेत राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचा जागर करण्यात आला. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मालगुंड येथील सध्या आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक एक म्हणून ओळखली जाणारी शाळा ५ ऑगस्ट १८५१ रोजी सुरू झाली. कवी केशवसुतांचे वडील दामले गुरुजी सुरुवातीच्या काळात मुख्याध्यापक होते. त्याच काळात राणी लक्ष्मीबाई झाशीमध्ये राज्य करत होत्या. पुढे १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्यसमराच्या त्या अग्रणी होत्या. त्यांच्या काही वंशजांचा मालगुंड गावाशी निकटचा संबंध होता. त्यांच्या काळात सुरू झालेल्या या शाळेत लक्ष्मीबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केल्याने आगळे औचित्य साधले गेले.

रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक, लेखक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यात माहेर आणि सासर असलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांशी केलेल्या संघर्षाची माहिती श्री. जोशी यांनी मुलांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितली. राणीचे चरित्र मुलांनी वाचून त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आई वडिलांना ही पुस्तके वाचायला देण्याचा आग्रह केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी लवकरच शताब्दी सुरू होणार असलेल्या संघाविषयीची माहिती सांगितली. गावातील विद्यार्थ्यांपर्यंत राणी लक्ष्मीबाईंची माहिती पोहोचली पाहिजे, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून संघातर्फे ग्रामीण भागातील शाळांमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो, असे त्यांनी सांगितले त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि शाळांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

संघातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राणी लक्ष्मीबाईंचे छोटेखानी चरित्र आणि गोष्टींची पुस्तके, शाळेला राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा आणि सुमारे तीन हजार रुपयांची उपयुक्त पुस्तके प्रदान करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्याकडे ही पुस्तके सुपूर्द करण्यात आली.

शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. इंदुमती सुरेश नाईक यांनी या कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. समारंभाला कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष मानस देसाई, कार्यकारिणी सदस्या सौ. सुयोगा जठार, प्रमोद कोनकर, सचिव सौ. शिल्पा पळसुले-देसाई, मालगुंड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट, उपाध्यक्ष सौ. भक्ती मयेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संतोष केळकर आणि ग्रामपंचायत सदस्य शुभदा मुळ्ये यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक आवर्जून उपस्थित होते. सौ. मयेकर यांनी राणी लक्ष्मीबाई जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. मानस देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धा आणि गुणानुक्रमे विजेते विद्यार्थी असे – चित्रकला स्पर्धा – इयत्ता पहिली – स्मिरा सागर मांडवकर, खुशी हेमंत खापणे, गार्गी महेश फडकले. दुसरी – चैतन्या गिरीश भाटकर, श्रीवेद सागर लिंगायत., अंश दशरथ कळंबटे. तिसरी – माऊली मंदार पात्ये, मनवा योगेश वेदरे, संस्कृती महेश फडकले. चौथी – रिशी जितेंद्र कातळकर, अनुश्री मयूर पाटील, आध्या तुषार दुर्गवळी.

हस्ताक्षर स्पर्धा – इयत्ता पहिली – अनुश्री सुनील मोडक, श्रीशा निखिल मांडवकर, गार्गी महेश फडकले. दुसरी – राजवीर अजिंक्य जाधव, अन्वी अनिल हुमणे, विहान विजय मांडवकर, प्रणव प्रसाद मुकादम. तिसरी – आदिती सचिन चव्हाण, युगा दिनेश भरणकर, विहान दिलीप भातडे. चौथी – हर्ष आनंद जोशी, ईश्वरी सौरभ केळकर, ईशिता सौरभ केळकर.

पाढे पाठांतर स्पर्धा – इयत्ता पहिली – अनुश्री सुनील मोडक, विवान चैतन्य सुर्वे, कार्तिक भूषण मयेकर. दुसरी – श्रीवेद सागर लिंगायत, अन्वी अनिल हुमणे, राजवीर अजिंक्य जाधव. तिसरी – आदिती सचिन चव्हाण, निखिल नीलेश लिंगायत, माऊली मंदार पात्ये, अद्वैत गिरीश बापट. चौथी – नील सुहास भातडे, हर्ष आनंद जोशी, वेदांत संदेश मांडवकर, ईश्वरी सौरभ केळकर.

वक्तृत्व स्पर्धा – पहिली – अनुश्री सुनील मोडक. दुसरी – राजवीर अजिंक्य जाधव, श्रीवेद सागर लिंगायत, तिसरी – माऊली मंदार पात्ये, निखिल नीलेश लिंगायत, विहान दिलीप भातडे, युगा दिनेश भरणकर. चौथी – हर्ष आनंद जोशी, नील सुहास भातडे, वेदात संदेश मांडवकर.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply