संस्मरणीय आणि आदर्श स्मृतिसोहळा

प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.

स्वातंत्र्यावर मर्यादा हवी

लोकांनी आपल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये उपस्थित राहून काम करण्यासाठी निवडून दिलेले असते. सातत्याने सभात्याग करणे म्हणजे लोकांच्या मतांचा अनादर आणि त्यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. भलेही सरकारने मांडलेले मुद्दे पटत नसले, तरी त्यासाठी सभागृहातून बाहेर पडायलाच हवे असे नाही. किंबहुना लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहणेच अत्यावश्यक आहे. ते सभागृहातील नियोजित कामकाजाच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वेळ सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर ती त्यांची अनुपस्थिती समजून खासदारकीच रद्द करण्याची तरतूद केली गेली पाहिजे.

सायबर संस्कारांना प्रारंभ

आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.

छत्र्या नकोत, शिक्षक हवेत

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या चिन्हासह नेत्यांचे फोटो असलेल्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की प्रचारावर बंधने येतात. पण त्याच्या आधीपासूनच उघडपणे प्रचार केला, तर उपयोग होतो, हे लक्षात घेऊन छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. अशा प्रचारात कल्पकता नक्कीच आहे; पण शाळांमधून प्रचार करणे योग्य आहे का, याचा विचार करायला हवा. शिवाय मुलांना छत्र्या देण्यापेक्षा पुरेसे शिक्षक दिले, तर शिक्षणाचा दर्जा सुधारायला मदत होणार आहे. त्याची खरी गरज आहे.

भाग्य अपुले अपुल्या हाते…

जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.

प्रबोधन आणि मनोरंजन

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक विकासाचे अधिकाधिक चांगले टप्पे पार करण्याचे एक साधन असते, पण विकासाच्या या मुद्द्याकडे सारेच प्रमुख उमेदवार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले असतात, पण तो एक उपचार असतो. विकासाचे मोठे स्वप्न त्या जाहीरनाम्यामध्ये छापले गेलेले असते. मी स्वतः काय करणार आहे, त्या जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातून माझी जबाबदारी कोणती आहे, मतदारांनी मी काय देऊ शकतो, राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी मी काय करू शकतो हे सांगण्याकडे उमेदवार सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात.