गहिवरली ओसरी..

साप्ताहिक कोकण मीडियाने २०१९च्या दिवाळी अंकासाठी घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेत रत्नागिरीतील अर्चना देवधर यांनी लिहिलेल्या ‘गहिवरली ओसरी’ या मराठी कथेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तीच ही कथा…

69903353_2349837108399517_4753047947782914048_nगणपतीबाप्पा आला, थाटामाटात त्याचं स्वागत झालं, ठरल्या दिवशी गौरी आल्या, भाजी-भाकरी, घावनघाटलं सगळे नैवेद्य झाले आणि अखेर विसर्जनाचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपला! आरती मंत्रपुष्प झालं, सालाबादप्रमाणे तात्या असल्यापासून सुरू असलेल्या प्रथेप्रमाणे त्यांच्या लेकाने-हेमंताने राखणीचा नारळ दिला, जमलेल्या लेकी-सुनांनी फुलंदूर्वा वाहिल्या आणि शेजारच्या परसूकाकांनी आपल्या घनगंभीर आवाजात गाऱ्हाणं घालायला सुरुवात केली, ‘जय देवा, गणपती गजानना, सालाबादप्रमाणे यथाशक्ती, यथामती तुझी सेवा केल्ये, ती मान्य करून घे! करवून घेणारा तूच आहेस आणि करायचं दळ बळ देणाराही तूच हो! यंदा जमले तसेच सगळे जण तुझ्या उत्सवासाठी येऊ देत आणि आमची ओसरी अभंग भजनाने आणि गप्पांनी भरून जाऊ दे! काही चूक-माक झाली असली, तर क्षमा कर नि खुशाल ठेव रे बाबा सगळ्यांना! ’

क्षणभर वाटलं, गणपतीबाप्पा ‘सगळं तुझ्या सांगण्याप्रमाणे करतो रे परशू’ असं म्हणतोय की काय! पण तेवढ्यात काकांनी ‘यान्तु देवगणा’ असा मंत्र म्हणून मूर्ती हलवल्यासारखं केलं आणि मोरया, ‘मोरया’चा गजर एकमुखाने सर्वांनी केला, प्रत्येक जण गहिवरला होता मनातून!

दर वर्षी मूर्ती उचलून नेणारा किसन आला, त्याच्या डोक्यावर मूर्ती ठेवून पुरुष मंडळी टाळ-झांजा वाजवत तळीवर निघाली. मुखाने ‘गणपती तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध’ असा गजर घुमू लागला. लेकी, सुना, नाती गौरीच्या विसर्जनाला निघाल्या. म्हातारी सुमनकाकू सगळ्या प्रसादाची जमवाजमव करून गणपती पोहोचवून येणाऱ्यांची वाट बघत पायरीवर बसली, पाणावलेल्या डोळ्यांनी. सोबतीला तिच्या धाकट्या जावा सुलोचना आणि हेमा होत्याच!

पायरीवर बसल्या बसल्या तिच्या डोळ्यांसमोरून ५५ वर्षांतल्या उन्हाळ्या-पावसाळ्याचं चित्र सरकू लागलं. त्यात सोसलेले अनेक वादळवारे, सुख-दुःखाच्या घटना आठवून ती कधी डोळे पुसत होती, कधी हसत होती! मात्र तिच्या मनावर कोरली गेली कालची सुखाची झुळूक आणणारी रात्र!

लग्न झाल्यापासून नाना तऱ्हेची माणसं, त्यांचे स्वभाव, सोसलेल्या व्यथा-वेदना यांमधून तावून सुलाखून निघालं होतं तिचं आयुष्य; पण सगळी वजाबाकी केल्यावर तिच्या लक्षात राहिला होता तो येईल त्या स्थितीत सगळ्यांनी संभाळलेला एकोपा!

सुमनकाकू आणि तात्यांचा संसार सुख-दुःखाच्या हेलकाव्यांमधून चालला होता. सासूबाईंच्या-भागीरथी काकूंच्या हाताखाली ती सगळं करण्या-सवरण्यात तयार झाली होती. जवळच शहरात राहणारे दोन दीर – यशवंत आणि श्रीधर घरी जमेल तसा मदतीचा हात देत होते. दोन्ही जावा – सुलोचना आणि हेमाही काही भलं-बुरं वगळता मनमिळाऊ होत्या. सणवारी सगळी एकत्र जमायची, एकमेकांच्या सल्लामसलतीने सगळं साजरं व्हायचं. असेच दिवस पुढे सरकत होते आणि शेजारी राहणाऱ्या एका कुळाने ह्या भावांच्यात दुही माजवण्याचा प्रयत्न केला. वादाची ठिणगी वाढून वाढून एकदा चक्क वणवाच पेटला! मग घरचं उत्पन्न, वाटे, देवकृत्य, कुळाचार, आजार-पाजारात एकमेकांना केलेली मदत, सगळ्या-सगळ्याचा लेखाजोखा मांडला गेला!

घरी राहणाऱ्या तात्या नि सुमनकाकूला हा धक्का पचला नाही. अगदी पाडव्याला बदललेला देव्हाऱ्यातला नारळसुद्धा आपण एकट्याने खाल्ला नाही. मग अचानक हे माझं-तुझं कसं काय होऊ लागलं आपल्या घरात, ह्या विचाराने तात्या सुन्न होऊन तासन् तास खुर्चीत बसून विचारात बुडू लागले.

सुमनकाकूची अवस्थाही फार वेगळी नव्हती. घशाखाली कसेबसे घास ढकलायची ती! तात्यांच्या तिन्ही मुलांची लग्न झाली त्या त्या वेळी सगळे कुटुंबीय एकत्र आले; पण वागण्या-बोलण्यात पूर्वीचा जिव्हाळा, आपुलकी नव्हती. कधी तरी हे चित्र बदलेल, ह्या आशेवर तात्या नि सुमनकाकू जगत होती. त्यांच्या सुनेची – हेमंताच्या बायकोची म्हणजे श्यामलची कूस बऱ्याच वर्षांनी उजवली आणि कन्या जन्माला आली तिच्या पोटी! तात्या-सुमनकाकूची विटलेली मनं पुन्हा एकदा टवटवीत झाली आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी ठरवलं, की जुने वाद-विवाद सगळं विसरून आपण आपल्या माणसांना बारशाला बोलवायचं, कुणी काही म्हणू दे! पण हे मळभ दूर करायचा आपण प्रयत्न तरी करू या! आणि काय आश्चर्य, प्रत्येक भावंडाच्या कुटुंबातल्या कुणी ना कुणी हजेरी लावली बारशाला! तात्या नि काकूंच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. मग कालांतराने दर वर्षी गणपती, नवरात्र, शिमगा आदी निमित्त करून एकेक जण येऊ लागले, बोलू लागले. घरही आनंदाच्या वाऱ्याची झुळूक अनुभवू लागलं.

दोन वर्षांपूर्वी तात्यांचं वार्धक्याने निधन झालं, तेव्हाही सगळे येऊन गेले. यंदाच्या गणपतीत अगदी क्रांती झाल्यासारखे यशवंत-सुलोचना यांचे मुलगे-सुना, धाकट्या श्रीधरच्या मुली-जावई सगळेच येऊन दाखल झाले.

सुमनकाकूच्या दोन्ही मुलीही आपल्या घरचे दीड दिवसाचे गणपती उरकून आल्या. शेजारचे परशूकाका म्हणाले, ‘आमची आई म्हणायची तसं नंदा गोकुळ जमलं हो आज ह्या छपराखाली!’

सुमनकाकूही आनंदी दिसत होती, उणीव होती ती फक्त तात्यांची! गौरीपूजनाच्या दिवशी साग्रसंगीत जेवण झालं. गायत्रीने, सुमनकाकूच्या धाकट्या लेकीने पूर्वीसारखे सगळ्यांसाठी विडे केले, पोरा-बाळांनी ह्या भाबड्या आत्याला दोन-दोन विडे पटकावून चांगलंच गंडवलं! संध्याकाळी सगळी फटावळ वाडीतले गौरी गणपती बघून आले आणि हेमंताने सुमनकाकूला फर्मावलं, ‘आई, तू पूर्वी करायचीस तशी अख्खे मूग घालून खिचडी कर आज रात्री.’

खरं तर दिवसभराच्या राबत्यामुळे दमली होती सुमनकाकू; पण लेकाचा शब्द मोडवेना तिला. उठली आणि खिचडीची तयारी करू लागली. सगळ्या पोरी-बाळी मदतीला धावल्या. हसत खेळत जेवणं झाली आणि मग ओसरीवर गप्पांचा फड रंगू लागला. नकला, गाणी सगळं झालं. सुमनकाकूचा नातू चिन्मय पेटी वाजवणारा होताच; तबला हेमंताने वाजवला. आणि आता ठरलं, भजन करायचं! सगळे बुवा आणि सगळेच धरकरी! तासभर असं काही भजन रंगलं, कr बोलायची सोय नाही! शेवटी ‘अवघा रंग एक झाला’ ही भैरवी म्हणून भजन संपलं. सगळे भारावले होते, वेगळ्या आनंदात न्हात होते. सुमनकाकूही तृप्तीची आसवं पदराआड लपवत होती. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं मनात म्हणत होती. श्यामलने, हेमंताच्या बायकोने सगळ्यांना आटीव दुधाचे कप भरून दिले आणि हा आनंदसोहळा संपला, सगळी निद्राधीन झाली.

आणि आज गणरायाच्या विसर्जनाचा दिवस उजाडला. पायरीवर बसल्या बसल्या हे सगळं आठवत होती सुमनकाकू! तळीवरून पोरं कधी परतली, तिला कळलंच नाही.

69994023_2368168919899669_1584077508922310656_oप्रसादाच्या ताटांवर सगळी अगदी तुटून पडली आणि एकेक जण निघण्याची भाषा करू लागला. सामानाची आवराआवर करून प्रत्येक जण काकूच्या समोर नमस्कारासाठी वाकू लागला. दोन्ही दीर-जावांनी ‘वहिनी, तब्येत सांभाळ, काही लागलं-सवरलं तर कळव’ असं सांगितलं. प्रत्येकाच्या मस्तकावर सुमनकाकूच्या डोळ्यांतल्या अश्रूंचा अभिषेक होत होता. तिला बोलायचं होतं काही तरी. म्हणून ती बळ एकवटू लागली. म्हणाली, ‘सासूबाई म्हणायच्या, एक भाकरी असली, तर तिघात वाटून खा रे बाबांनो! आता काळाप्रमाणे वेगळं राहणं टाळता येत नाही; पण एकच सांगते, ‘कुठल्या फांदीवर राहायचं ते ज्याचं त्याने ठरवावं; पण ज्या झाडावरच्या घरट्यातून झेप घेतली त्याची मुळं नि त्याखालची माती ह्यांना विसरू नये कधी’. सगळ्यांनी तिच्या बोलण्याला संमती दर्शवली आणि एकेक जण बाहेर पडू लागला. अंगणात पुन्हा भेटीच्या आश्वासनार्थ हात हातात मिळाले, तेवढ्यात सुमनकाकूची मोठी लेक शर्वरी एक चिटोरकं हाती घेऊन आली आणि त्यातले शब्द ऐकूनच सगळ्यांनी निघा, असं म्हणाली.

टाळ-मृदंगाच्या नादी सारे वादळ विरले,
दूर गेलेल्या नात्यांचे धागे पुन्हा एक झाले
डोळ्यांतून पाझरल्या मायाममतेच्या सरी
एकोप्याच्या आनंदात गहिवरली ओसरी।

अर्चना अशोक देवधर, साईनगर, रत्नागिरीFollow Kokan Media on Social Media

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply