करोनाच्या सावटाखाली हीरकमहोत्सव

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर १ मे १९६० रोजी सध्याचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. तेव्हापासून त्यादिवशी महाराष्ट्र दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. या वर्षीचा हीरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन मात्र अत्यंत साधेपणाने साजरा करण्याची वेळ करोनाच्या संकटामुळे आली आहे.

करोनाच्या सावटाखाली साधेपणाने साजरा करावा लागणार असलेला हा हीरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन इतरही काही बाबतीत पूर्वीपेक्षा वेगळा ठरणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मात्र ते विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एकाही सदनाचे सदस्य नाहीत. यापूर्वीही बॅरिस्टर ए. आर. अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या सहा नेत्यांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा हे नेते विधान परिषद किंवा विधानसभा यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. ते त्यावेळी लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य होते. नंतर हे नेते विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांची त्यावेळची विधानसभा किंवा विधान परिषदेवरची निवड नक्की होती. उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा सदस्यत्वाची सध्या शक्यता नाही. त्याचबरोबर सहा महिन्यांची मुदत भरत आली तरी त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वावर अजूनही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत तूर्त तरी अनिश्चितता आहे. यापूर्वीच्या कोणाही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत महाराष्ट्र दिनाच्या वेळी अशी अनिश्चितता नव्हती.

महाराष्ट्राची स्थापना १९६० साली झाली. त्यानंतर मराठीपण आणि मराठी बाण्यासाठी निर्माण झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नामशेष झाली आणि सहा वर्षांनी शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर मराठीपणाचे नेतृत्व शिवसेनेने खऱ्या अर्थाने पुढे नेले. अशा पक्षाच्या नेत्याला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून हीरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन थाटात साजरा करता येणे शक्य होते. ती संधी हुकली आहे. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजवंदन होणार असले, तरी यावेळचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी तोही जास्तीत जास्त पाच जणांच्या उपस्थित करावा लागणार आहे. यापूर्वी असे घडले नव्हते. आणखी एक वेगळेपण म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेची अवघी कारकीर्द गेली, त्याच काँग्रेसच्या आणि काँग्रेस मानसिकतेच्या पक्षाच्या आधाराने सध्या राज्य चालविले जात आहे. त्याचे नेतृत्व शिवसेनेच्या पक्षप्रमुखाकडे आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिन साजरा करताना वेगळा उत्साह निर्माण झाला असता. वर्षानुवर्षांचे विरोधक एकत्र येऊन महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत, असे आगळेवेगळे चित्र यावर्षी दिसले असते. पण या आनंदाला तिन्ही पक्ष मुकले आहेत. राज्य पातळीवर असे परस्परविरोधी विचारसरणीचे दोन पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष एकदिलाने महाराष्ट्र दिन साजरा करत असल्याचे चित्र पाहायला महाराष्ट्राची जनताही मुकली आहे.

ज्या दिवशी महाराष्ट्राच्या यशाच्या गाथा गायिल्या गेल्या पाहिजेत, संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या १०६ हुतात्म्यांची आठवण केली गेली पाहिजे, त्या दिवशी करोनामुळे हकनाक बळी गेलेल्यांची संख्या मोजावी लागणार आहे. देशभरात सर्वाधिक बळी गेलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद होणार आहे. ही नामुष्की जगद्व्यापी आजाराने महाराष्ट्रावर आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवावर विरजण पडले आहे. करोनासारख्या आजाराने संपूर्ण जगाचे अर्थचक्र थंडावले आहे. भारत आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. पण मोठ्या संकटात नेतृत्व करण्याचे, देशाला आणि जगाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. हा इतिहास लक्षात घेतला, तर करोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे आणि भयाण भविष्याचे सारे मळभ दूर होऊन साठ वर्षांत जेवढी झाली नाही, तेवढी आणि करोनासारख्या आजारामुळे खंडित झालेली महाराष्ट्राची प्रगती पुढच्या पंधरा वर्षांमध्ये व्हावी, महाराष्ट्राचा अमृतमहोत्सव शतपटीने उत्साहात साजरा करण्याचे बळ महाराष्ट्राला मिळावे, याच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, एक मे २०२०)
    (अंक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply