रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमध्ये सवलत दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार उद्या (दि. ८ मे) राज्यातील मुंबई आणि पुणे वगळता इतर आठ जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी २५ एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार मंजुरी मिळालेल्यांना राज्यातील इतर जिल्ह्यांत पाठविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अशा सर्वांना आठ मेपासून जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून एसटीतून जाता येणार आहे. अशा एकूण २५ बसेस उद्या जिल्ह्यातून निघतील. प्रत्येक गाडीतून २२ जणच प्रवास करू शकतील. (वेळापत्रक खाली दिले आहे.)
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद झाली. जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या. त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊनची मुदत वाढली. याबाबत राज्यात झालेल्या निर्णयानुसार आता जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे शक्य होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सादर झालेल्या अर्जांमधील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाड्यांमधून विविध जिल्ह्यांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, लांजा, दापोली, गुहागर, मंडणगड, राजापूर, खेड आणि देवरूख या नऊ एसटी बसस्थानकांवरून सिंधुदुर्ग, अलिबाग, बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती येथे दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत या गाड्या वेळापत्रकानुसार सुटणार आहेत. ज्यांच्याकडे अशा प्रवासाची परवानगी आहे, त्यांनी आपापल्या शहरातील बसस्थानकावर वेळेच्या दोन तास आधी बसस्थानकावर पोहोचायचे आहे. प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य तपासणीपत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे सूचित करण्यात आले आहे.
