मुंबईसारख्या शहरात रोजगाराविना राहणे कठीण आहे. अत्यंत कमी जागेत लोकांनी दाटीवाटीने आणि त्रासदायक ठरू शकते, यात संदेह नाही. कोकणात आल्यानंतर ही चाकरमानी मंडळी मोकळेपणाने राहू शकतात, हेही खरे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मिळून लाखभर चाकरमानी येऊ इच्छितात, असे सांगितले जाते. त्यांना एसटीने मोफत घरी सोडण्याची तयारीही राज्य शासनाने चालविले आहे. पण ही मंडळी कोकणात येऊन करणार काय, हा खरा प्रश्न आहे. कारण मुंबईतील व्यवहार आजचे उद्या, पंधरा दिवस, महिनाभरात कदाचित पूर्ववत होतील आणि त्यानंतर जे काही छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय, नोकऱ्या असतील त्या सुरू होण्याची शक्यता ज्यांना वाटते, ती मंडळी मोठा त्रास सहन करून कोकणात येण्याची शक्यता नाही. ज्या मंडळींना रोजगाराची खात्री नाही, अशीच मंडळी कोकणात यायला उत्सुक असण्याची शक्यता आहे. मुंबईत ज्या वेगाने पुन्हा रोजगार निर्माण होऊ शकतात, ती परिस्थिती कोकणात नाही. म्हणूनच मुळात कोकणातील लोक मुंबईत रोजगारासाठी जात असतात. त्यामुळे अशी बेरोजगार मंडळी कोकणात आली, तर त्यांना दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही मंडळी कोकणातील कुटुंबात सामावली जातील, याची शक्यता वाटत नाही. अचानक कोणताही मोठा रोजगार कोकणात उपलब्ध होणे कठीण आहे.
मोठ्या प्रमाणावर मुंबईतून चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी धडपडणाऱ्या मंडळींनी या साऱ्या परिस्थितीचा विचार केल्याचे दिसत नाही. कोकणात येण्यासाठी तळमळणाऱ्या चाकरमान्यांना एकदाचे कोकणात आणून सोडले की इतिकर्तव्यता झाली, असे त्यांना वाटत आहे. आपण कोकणवासीयांसाठी फार मोठे काही केले किंवा करणार आहोत, असेही त्यांना वाटत आहे. अर्थातच जी मंडळी धोकादायक परिस्थितीतही चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी धडपडत आहेत, त्यांच्या दूरदृष्टीबद्दल फारशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने दीड-दोन महिने लॉकडाऊन जारी करण्यात आला. एकमेकांचा संपर्क वाढू नये, प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखले जावे, हा त्यातील मूळ उद्देश आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात आले, तर त्यांचे विलगीकरण आणि उपचार करण्याएवढी कोकणातील आरोग्य व्यवस्था सक्षम नाही, याचाही विचार केला गेला नाही. कोकणात येणाऱ्या व्यक्ती बरोबर आजार घेऊन येणार असतील, तर संपूर्ण कोकण म्हणजे रेड झोन होऊन जाण्याचीही भीती आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या स्वरूपात असले, तरी स्थलांतर करणे धोकादायक आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढविणारे आहे. हे लक्षात घेऊन चाकरमान्यांना मुंबईतच ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. माझा महाराष्ट्र
, माझी मुंबई
असा सातत्याने धोशा लावणाऱ्यांना मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत चाकरमान्यांची दीड-दोन महिने सोय करणे मुळीच कठीण नाही. तरीही चाकरमान्यांना कोकणात पाठविण्याचा आणि आणण्याचा आग्रह लक्षात घेतला की तशी क्षमता माझा महाराष्ट्र
आणि माझी मुंबई
म्हणणाऱ्यांकडे नाही, हेच सिद्ध होते.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ मे २०२०)
(साप्ताहिक कोकण मीडियाचा आठ मे २०२० रोजीचा अंक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media

One comment