रत्नागिरी : विविध मालवाहू जहाजांवर काम करणारे कोकणातील अधिकारी, सी-मेन्सना (खलाशी) परत आणण्याकरिता भाजपचे कोकणातील नेते बाळ माने यांनी पुढाकार घेऊन डीजी शिपिंग व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. कोकणात किमान पाच हजार सी-मेन्स असून, त्यातील बरेच जण नोकरीवर आहेत. हे सारे जण घरी परतावेत, अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. म्हणून माने यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. करोनाच्या संकटात मजूर, कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था सुरू आहे. परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना परत आणले जात आहे; मात्र समुद्रात बोटीवर नोकरी करणाऱ्या सी-मेन्सना आणण्यासाठी अद्याप व्यवस्था झालेली नाही. याकरिता डीजी शिपिंग व मेरिटाइम बोर्डाकडून काही सूचना दिल्या आहेत. आंबा, काजू, मच्छीमारांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना सी-मेन्सचा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी सी-मेन्सच्या कुटुंबीयांनी बाळ माने यांच्याकडे केली आहे.
जहाजाच्या डेकवर कॅप्टन, चीफ ऑफिसर, सेकंड व थर्ड ऑफिसर आणि इंजिन विभागात चीफ इंजिनीअर व सेकंड, थर्ड व फोर्थ इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, चीफ कुक यांसह सीमेन्स काम करत असतात. एक लाख टनाच्या जहाजावर सुमारे २४ ते २५ अधिकारी, सी-मेन्स काम करतात. सायनिंग ऑफ म्हणजे ड्युटी संपताना नेहमी जवळच्या बंदरात सोडण्याची व्यवस्था जहाज कंपनीतर्फे केली जाते. तिथून विमानाने गावी परत येण्याची सोय केली जाते. परंतु करोना महामारीमुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे या सी-मेन्सना कोकणात येण्यासाठी खूप दिवस जाणार आहेत. तसेच तपासणी, क्वारंटाइन आदी मुद्देही आहेत. या प्रश्नावर लवकर योग्य मार्ग काढण्यासाठी बाळ माने यांनी डीजी शिपिंग व भारत सरकारकडे संपर्क साधला आहे.