लांज्यातील दोन लहानग्यांना करोना; रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७

रत्नागिरी : आज (ता. ११ मे) सायंकाळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांमध्ये पाच जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४७ झाली आहे. आज निश्चिती झालेल्या रुग्णांमध्ये लांजा तालुक्यातील नऊ आणि १० वर्षांच्या दोघा लहानग्यांचा समावेश आहे. लांजा तालुकाही आता करोनाबाधित तालुक्यांच्या यादीत आल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी आता केवळ राजापूर तालुका करोनामुक्त राहिला आहे.

आज सायंकाळी सात जणांचे करोनाविषयक तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, त्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर एक निगेटिव्ह आला आहे. एक अहवाल अपुरा नमुना असल्याने मिळू शकला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन रुग्ण रत्नागिरीच्या परिचारिका केंद्रातील असून, एक रुग्ण रत्नागिरीजवळच्या झाडगाव येथील रहिवासी आहे. त्याशिवाय लांजा येथील दोन लहान मुलांचाही यात समावेश आहे.

दरम्यान, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (११ मे) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात अडकून पडलेल्या परप्रांतातील नागरिकांसाठी दोन रेल्वेगाड्या मंजूर झाल्या असून, त्यातील एक झारखंडसाठी, तर दुसरी मध्य प्रदेशसाठी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे नसणाऱ्या नागरिकांना आता संस्थात्मक विलगीकरणात न ठेवता, होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी गाव पातळीवर समिती तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत बाजारपेठा उघडण्याबाबतचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, ते याबाबत नियोजन करून कार्यवाही करतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply