मुंबईत घुसमटलेल्या चाकरमान्यांचा प्रातिनिधिक सवाल
मुंबई : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तीन ३ महिने मुंबईत अपुऱ्या जागेत राहावे लागलेल्या चाकरमान्यांची घुसमट आता वाढली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आपल्याला कोकणात जाता येईल, असे वाटणाऱ्या आणि रीतसर परवानगी घेऊन कोकणात येऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांची मोठी निराशा झाली आहे. आरवली (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथील मूळचे रहिवासी आणि सध्या भांडुपच्या कोकणनगरात राहणारे जयेश वालावलकर यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्याबाहेरील प्रवाशांना त्यांचा मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्यावर राज्य शासन खर्च करत आहे. मात्र स्वतःच्या कोकणातील घरी कोकणात जाण्यावर राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. गावी जाण्याकरिता ईपास अर्ज करण्याबाबत नक्की कोणाकडूनही ठोस माहिती मिळत नाही. मूळचा कोकणवासीय चाकरमानी जीव मुठीत घेऊन मुंबईत फसला आहे. त्याला शेतीकामासाठी तसेच इतर गोष्टींसाठी गावी जायचे झाले, तर एसटी किंवा रेल्वेची सोय नसल्याने खासगी वाहनाने २० ते २५ हजार रुपये भाडे भरून जायची तयारी करावी लागत आहे. एवढे करून कोकणात जायचे झाले, तर कोकणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा नसल्याने तेथे जाऊनही त्याची पंचाईत होणार आहे. ही स्थिती पाहता मुंबईमध्ये राहणाऱ्या मूळच्या कोकणवासीय चाकरमान्यांना कोणी वाली नाही, अशीच भावना झाली आहे, असे श्री. वालावलकर यांनी पत्रात म्हटले आहे. वैध मार्गाने कोकणात येऊ इच्छिणाऱ्या, पण मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांच्या भावना या प्रातिनिधिक पत्रातून स्पष्ट झाल्या आहेत.
हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्य सचिव अजॉय मेहता, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, कोकणातील आमदार, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी इत्यादींना पाठवले आहे.
…………
श्री. वालावलकर यांचे सविस्तर पत्र असे –
सर्व मान्यवरांना नमस्कार.
मी जयेश नारायण वालावलकर.
राहणार मुंबई, मूळ गाव, आरवली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
आपल्या सर्व नेते मंडळी तसेच वृत्तवाहिनींचे लक्ष वेधू इच्छितो की,
मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही मागील ३ महिने मुंबईच्या १०X१८ च्या खोलीमध्ये बसून घरी राहा ह्या आवाहनाला साथ देतोय.
त्यासाठी सर्वप्रथम २२ मार्च २०२० रोजी तुतारी एक्स्प्रेस ह्या दादर वरून सुटणाऱ्या आणि सावंतवाडी साठी प्रस्थान करणाऱ्या ट्रेनचे आरक्षित तिकीट असून देखील आम्ही गावी न जाण्याचा घेतलेला निर्णय.
त्यानंतर सहकुटुंब विचारविनिमय करून आम्ही २२ एप्रिल २०२० रोजी गावी जाण्याचा निर्णय घेतला, परंतु रेल्वे मंत्रालयाने सर्व गाड्या रद्द केल्यामुळे आम्हाला त्याठिकाणी गावी जाणे शक्य झाले नाही.
त्यानंतर अशाच प्रकारे १८ मे २०२० साठी तिसऱ्यांदा ट्रेनच आरक्षण केलं पण पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले.
त्यानंतर अनेक ठिकाणाहून तसेच वृत्तवाहिन्यांमधून बातम्या येऊ लागल्या की राज्याबाहेरील जाणाऱ्या प्रवाशांना त्यांचा मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे पण आपल्या स्वतःच्या कोकणातल्या घरी कोकणात जाण्यावर महाराष्ट्र शासनाकडून निर्बंध घातले गेले आहेत. गावी जाण्याकरिता ई-पास अर्ज करण्यावरून आज बराच संभ्रम निर्माण झाला आहे. नक्की कोणाकडुनही ह्या संदर्भात ठोस माहिती मिळत नाहीय. मूळचा कोकणवासीय चाकरमानी आज जीव मुठीत घेऊन मुंबईत फसला आहे, त्याला शेतीकामासाठी तसेच इतर गोष्टींसाठी गावी जायचे आहे परंतु त्याच्याकडे स्वतंत्र गाडी करून गावी जाण्यासाठी आकारण्यात येणारे २०,००० ते २५,००० रुपये भाडेरूपी पैसे खर्च करण्याची क्षमता नाहीय. आज बाहेरगावी जाण्यासाठी लोकांवर प्रशासन पैसे खर्च करत आहे, पण आपल्या स्वतःच्या कोकणवासीयांना मात्र मुंबईमध्ये कोंडून ठेवण्यात येत आहे. वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार काही ठिकाणी खारेपाटण चेक पोस्ट वरून चाकरमान्यांना चक्क पुन्हा मुंबई ला पाठवण्यात येत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. हे आपल्याला शोभेसे नाही. ह्या कृत्यामुळे आपण कोकणी माणसाची विश्वासार्हता गमावत आहेत, हे लक्षात घ्या.
मागील ७० दिवस आम्ही तुमचेच ऐकत आलोय आणि नक्कीच यापुढेसुद्धा ऐकू. पण काय केलंय तुम्ही कोकणी चाकरमान्यांसाठी? जर काही केलंय कोकणवासीयांसाठी, तर कसं चाकरमानी लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश द्यायच नाही, ह्याचे नियोजन!
२५,००० रुपये खर्च करून गावी जाणे शक्य नसल्यामुळे पुन्हा एकदा ८ जून २०२० च्या नेत्रावती एक्स्प्रेसचे तिकीट आम्ही तसेच सामान्य चाकरमान्यांनी आरक्षित केले. पण पदरी पडली ती पुन्हा एकदा निराशाच. याचे सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्य शासन आहे. त्यांना कोकणातील चाकरमान्यांना मुंबईमधून त्यांच्या सुरक्षित ठिकाणी स्वतःच्या घरी जाऊ देण्याची इच्छाशक्ती दिसत नसल्याचं स्पष्ट होतंय. कोणतेही कारण न देता आमचे आरक्षित तिकीट काल रद्द करण्यात आले.
शासनाने एक सांगावे, आपला गाव बरा असे म्हणत उद्या सरसकट चाकरमानी मुंबईकर रस्त्यावर उतरला आणि गावाकडे चालू लागला तर ते योग्य ठरेल का? महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की कृपया कोकण रेल्वे मार्गावर विशेष पॅसेंजर ट्रेन फक्त अडकलेल्या चाकरमान्यांसाठी सोडाव्यात. अडकलेल्या लोकांना परत जाण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी, आज कोकणातील सरकारी पक्षातील कुठल्याच नेत्याला याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज वाटत नाहीय. याचे प्रत्येकाला आश्चर्यच वाटत आहे. जर परप्रांतीय लोकांसाठी कोकण मार्गावरून ट्रेन धावत असेल तर कोकणी माणसासाठी का नाही ह्याचे उत्तर प्रशासनाने द्यावे आणि त्वरित ह्यावर योग्य ती अंमलबजावणी करावी.
ज्याठिकाणी आम्ही कुटुंबातील ४ जण केवळ १,००० रुपये खर्च करून आमच्या मूळ गावी पोहोचू शकतो, त्याठिकाणी प्रशासन आम्हाला २५,००० रुपये खर्च करून गावी जा, ह्या मानासिकतेमध्ये दिसत आहे. जर असे असेल तर शासनाकडे आमची मागणी आहे की वरील खर्च आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून करावा आणि आमच्या मूळ गावी जाण्याची सोय त्वरित करावी. मूळ गावी गेल्यावर सरकारने आखून दिलेल्या नियामावलीचे तंतोतंत पालन आम्ही करू, ह्याची हमी आज आम्ही ह्या माध्यमातून देतोय.
अन्यथा अजून किती दिवस आपण वैद्यकीय व्यवस्था नसल्याची कारणे देऊन चाकरमान्यांना मूळ गावी जाण्यासाठी थांबवून ठेवणार आहात, ह्याचे उत्तर द्यावे. आज आरोग्य यंत्रणेवर हजारो कोटी रुपये खर्च होत असल्याची कबुली आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री करत आहेत. उपचारांसाठी. हीच योग्य वेळ आहे कोकणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्याची.
सद्यपरिस्थिती पाहता मूळच्या कोकणवासीय मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचा वाली कोण आहे हाच प्रश्न सामान्य चाकरमान्यांना पडलाय आणि हेच सत्य आहे.
पत्राच्या सरतेशेवटी एकच विनंतीजमा आवाहन आहे की ह्या मागणीवर आपण सर्वांनी लक्ष वेधून त्वरित पावले उचलावी आणि कोकणातील अडकून पडलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची मुभा द्यावी.
आपण विद्वान मंडळी ह्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्याल हीच एक खात्री उराशी बाळगून आपल्या उत्तराची प्रतीक्षा करेन.
धन्यवाद.
जयेश वालावलकर
- सामान्य माणूस
(९९२०१०५०९१)
आम्ही अश्याच प्रकारे रत्नागिरी डी .एच.ओ.यांचे लक्ष वेधले होते पण सर्व निष्फळ आहे.प्रतेक पुढारी हा आपल्या राजकारणात गुरफटलाय.कोकणी माणसाला वाली कोण राहिला नही असे वाटते……
जिल्हा अधिकारी कार्यालयात पण सम्पर्क केला होता आरोग्य यंत्रणा जी बंद आहे ती तबडतोब सर करावी…..पण या कडे कोणाचे लक्ष नाही…….