एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरिवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे. ज्यांना आंब्यांच्या पेट्या पाठवायच्या असतील, त्यांनी नोंदणीसाठी विभागीय भांडार अधिकारी किंवा वाहतूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटीतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठीचे संपर्क क्रमांक असे : (02352) 222578, 9518736917, 9403959622, 8766453926.

मुंबई-पुण्यासह राज्यभरात कोठेही आंब्याच्या पेट्या पाठविता येतील. मात्र अंतरानुसार त्याचे भाडे वेगवेगळे असणार आहे. मुंबई किंवा पुण्याला आंब्याची एक पेटी पाठविण्यासाठी सुमारे १५० रुपये भाडे आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे आंब्याच्या पेट्या एसटीच्या बसस्थानकावर जाऊन स्वीकारण्याची गरज नाही. एसटीच्या मालवाहतुकीचा जो मार्ग असेल, त्या मार्गावर कोणत्याही ठिकाणी आंब्याच्या पेट्या उतरविल्या जातील. ग्राहकांसाठी ही मोठीच सोय एसटीने उपलब्ध करून दिली आहे. राज्यभरात आंबे पाठविता येणार असले, तरी करोनाप्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) आंबे पाठविता येणार नाहीत.

या निर्णयाची माहिती परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी फेसबुकवर जाहीर केली. गेली ७२ वर्षे अविरत सेवा पुरविणाऱ्या एसटीकडे २५० आगारे आणि ६०१ बसस्थानकांत सुमारे १८ हजार ५०० बस आणि ३०० ट्रक असा सुसज्ज ताफा असून, विहित आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून नऊ मेट्रिक टन वजनापर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे.

मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था महामंडळाच्या प्रत्येक आगारात व बस स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या, तसेच इतर मालाच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असल्याने अतिशय माफक दरात मालवाहतूक करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

मालवाहतुकीची कार्यप्रणाली, तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे.

शेतकरी, व्यापारी, उद्योजकांचे हित साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधितांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही अॅड. परब यांनी केले आहे.

One comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s