रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २६ मे) सायंकाळी करोनाबाधितांमध्ये १४ जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या १७५ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज १२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. आज एका रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मृत झालेल्यांची संख्या पाच झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या संशयित करोनाबाधितांचे १७ अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६ जणांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर ८ जण राजापूर येथे क्वारंटाइन आहेत.
कामथे येथे आज सहा रुग्ण आढळले. ते सर्व मूळचे धामेली-गायकरवाडीत राहणारे आहेत. सर्वजण मुंबईत एकाच चाळीत राहत होते. तेथून ते आपल्या गावी आले होते. त्यातील एक रुग्ण ४५ वर्षे वयाचा आहे. मुंबईतून आल्यानंतर त्याला १९ मे रोजी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यान, या रुग्णाच्या नातेवाइकाचा मुंबईत अंधेरी येथील घरी अज्ञात कारणाने २३ मे रोजी मृत्यू झाल्याची माहिती मिंळाली. ती मिळाल्यानंतर २१, २४, २४, २६ आणि ४९ वर्षे वयाचे इतर पाच जण २४ मे रोजी तपासणीसाठी आले. आज त्या साऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे त्या साऱ्यांना सावर्डे येथे कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दापोलीतील ९ आणि संगमेश्वरमधील ३ अशा एकूण १२ रुग्णांना आज उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या ६७ झाली असून १०३ जण उपचारांखाली आहेत. आतापर्यंत ५ जण मृत्युमुखी पडले आहेत.
प्रिंदावणमध्ये एकाच वेळी चार रुग्ण
आज एकाच दिवशी राजापूर तालुक्यात ८ करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या १३ वर गेली आहे. राजापूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या वडदहसोळ आणि कशेळी येथील त्या कुटुंबातील आणखी तिघाजणांसह एकाच दिवशी तब्बल आठजण करोनाबाधित आज सापडले. त्यामध्ये विखारे गोठणे, कशेळी, वडदहसोळ, ओणी आणि प्रिंदावण या गावांमधील रुग्णांचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये राजापूर तालुक्यात विखारेगोठणे येथे एक, कशेळी आणि वडदहसोळं येथे प्रत्येकी दोन असे पाच रुग्ण आढळले होते. त्यानंतर, गेले तीन दिवस तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे राजापूरवासीय काहीसे निर्धास्त होते. मात्र आजच्या सायंकाळच्या वैद्यकीय अहवालाने राजपूरकरांची झोप उडवली आहे.
वदडहसोळ येथील ज्या कुटुंबात यापूर्वी दोघे करोनाबाधित सापडले होते, त्याच कुटुंबातील आणखी दोघे आज करोना पॉझिटिव्ह आढळले. कशेळीतील त्याच कुटुंबातील आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. या दोन गावांव्यतिरिक्त आज ओणीमध्ये एक रुग्ण आढळला असून प्रिंदावण येथे एकाचवेळी तब्बल चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता रुग्णांची संख्या तेरावर जाऊन पोहोचली आहे.
आणखी एक मृत्यू
मुंबईतून १८ मे रोजी माळवाशी (ता. संगमेश्वर) येथे आलेल्या एका ६१ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज (२६ मे) सकाळी रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला १९ मे रोजी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला सारी या आजाराची लक्षणे दिसल्याने रत्नागिरीत पाठवण्यात आले. १९ मे रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल २१ मे रोजी आला होता. या रुग्णास अर्धांगवायूचाही त्रास होता. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील नरमे, तसेच संगमेश्वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरुख आणि पांगरी ही गावे करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media