सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
संबंधित तरुण आपल्या पत्नी आणि मुलीसह मालाडहून खासगी गाडी घेऊन काल गुळदुवे गावात आला होता. गावात आल्यानंतर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं होतं. परंतु रात्री अचानक या तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला उपचारांसाठी शिरोडा उप-जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या तरुणाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्र आज खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या आरोग्य केंद्रात कोणाचीही, कोणत्याही प्रकारची तपासणी होणार नाही, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ असून, त्यापैकी सात जण करोनामुक्त झाले आहेत. दहा जणांवर उपचार सुरू आहेत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media