रत्नागिरीची रुग्णसंख्या १८३वर; नवे आठ करोनाबाधित सापडले

रत्नागिरी : काल रात्री (२६ मे) उशिरा आलेल्या अहवालांनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १८३वर पोहोचली आहे. या आठपैकी सहा जण रत्नागिरीतील, तर दोन जण संगमेश्वरातील आहेत. रत्नागिरीतील सहा जणांपैकी चार जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.

कालच्या (२६ मे) एकाच दिवसात एकूण २२ रुग्णांची भर पडली. काल सायंकाळी १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, तर रात्री उशिरा आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान, काल १२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. तसेच, काल एका रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मृत झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. १११ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

काल रात्री (२६ मे) रोजी पॉझिटिव्ह असलेल्या रत्नागिरीतील सहा रुग्णांपैकी चार पुरुष, तर दोन स्त्रिया आहेत. ४८ वर्षांचा पुरुष मुंबईतून चेंबूर येथून २१ मे रोजी पुनस कुंभारवाडी या आपल्या गावी आला. २४ मे रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. ४८ वर्षांचा आणखी एक पुरुष मालाडमधून २३ मे रोजी नाणीज (घडशीवाडी) येथे परतला. ताप, अंगदुखीमुळे तो जिल्हा रुग्णालयात दाखल होता. या व्यक्तीची पत्नीही पॉझिटिव्ह असून, तीही जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. १४ वर्षांची एक मुलगी कांदिवलीतून राजापुरात आली होती. तिचे आई, वडील आणि भाऊ हेदेखील पॉझिटिव्ह असून, रत्नागिरीत दाखल आहेत. ४८ वर्षांचा पुरुष मुलुंडमधून १९ मे रोजी दख्खन (ता. संगमेश्वर) येथे परतला होता. सध्या तो जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. या व्यतिरिक्त रत्नागिरीतील शांतीनगर येथील १८ वर्षांचा एक युवक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये होता. आता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

काल सापडलेले संगमेश्वरमधील दोन रुग्ण हे पती-पत्नी आहेत. विरारमधून ते मानसकोंड, फेफडेवाडी येथे आले होते.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply