रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत आज (२७ मे) १२ रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये हे स्पष्ट झाले. या १२पैकी सहा जण रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असून, तीन जण कळंबणी येथे, तर तीन जण राजापूर येथे आहेत.
रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या सहा रुग्णांमध्ये दोन स्त्रिया आणि चार पुरुष आहेत. ४५ वर्षांची एक स्त्री मजगाव रोडची रहिवासी असून, ठाण्यातून आली आहे. ४४ वर्षांची स्त्री साखरप्यातील मुरलीधर आळीतील असून, तीही मुंबईतून आली आहे. ६२ वर्षांचा एक पुरुष भंडारपुळे (रत्नागिरी) येथील, ५७ वर्षांचा एक पुरुष उक्षी वरची वाडी (संगमेश्वर) येथील २७ वर्षांचा एक पुरुष आगवे (रत्नागिरी) येथील, तर २५ वर्षांचा एक पुरुष साखरपा-देवळे (संगमेश्वर) येथील आहे. हे सर्व जण मुंबईतून आले असून, सर्व जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
राजापूर तालुक्यातील रुग्णांमध्ये प्रिंदावण येथील ३९ वर्षीय पुरुष, कोतापूर येथील ५५ वर्षीय पुरुष आणि कोंडिवळे येथील आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण अनुक्रमे कुंभवडे, सोलगाव आणि ओणी येथील रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
दरम्यान, आतापर्यंत ७६ जणांना उपचारांनंतर करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णांची संख्या ११४ एवढी आहे.
पाच विद्यार्थिनी करोनामुक्त
दरम्यान, रत्नागिरीतील शासकीय परिचारिका महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनी करोनामुक्त झाल्या आहेत. या पाच विद्यार्थिनींना आज (२७ मे) जिल्हा रुग्णालयातर्फे निरोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
नर्सिंग महाविद्यालयातील एकूण सात विद्यार्थिनींना करोनाची लागण झाली होती. सातपैकी पाचजणींची प्रकृती पूर्णतः बरी झाली असून, त्या करोनामुक्त झाल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. करोनामुक्त केल्याबद्दल त्या विद्यार्थिनींनी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
