रत्नागिरी जिल्ह्यात सात जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात सात नवे रुग्ण सापडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी येथील ग्रामीण रुग्णालय आणि सावर्डा येथील रुग्णालय येथून प्रत्येकी एक आणि दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातून पाच अशा एकूण सात करोना रुग्णांना उपचारांनंतर बरे झाल्यावर आज (२८ मे) घरी सोडण्यात आले. तसेच, मुंबईतून काल (२७ मे) रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या एका पुरुषाला (वय ३० वर्षे) करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्या रुग्णाला मुंबईत नायर रुग्णालयात केलेल्या तपासणीचा अहवाल प्रवासादरम्यान प्राप्त झाला. त्यातून तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तो रुग्ण थेट जिल्हा रुग्णालयात येऊन दाखल झाला.

त्यामुळे रत्नागिरीतील एकूण रुग्णांची संख्या १९६ झाली असून, त्यापैकी १०८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ८३ रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे.

सिंधुदुर्गात सात नवे रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (२७ मे) रात्री दोन आणि आज (२८ मे) दुपारी पाच असे एकूण सात नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात कणकवली तालुक्यातील एक, वैभववाडी तालुक्यातील दोन, कुडाळ तालुक्यातील दोन, तर सावंतवाडी तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या २४ झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत सात जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे १७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील २२ वर्षीय पुरुष, कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील २२ वर्षीय युवती आणि ५० वर्षीय महिला असे तिन्ही रुग्ण कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे यापूर्वी आढळलेल्या करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहेत. यातील शिवडावच्या रुग्णाचा स्वॅब २५ मे रोजी, तर पणदूर येथील दोन्ही रुग्णांचा स्वॅब २६ मे रोजी घेण्यात आला होता. शिवडाव येथील रुग्णाचा स्वॅब काल (२७ मे) रात्री प्राप्त झाला असून, पणदूर येथील दोन्ही रुग्णांचा स्वॅब आज (२८ मे) दुपारी प्राप्त झाला आहे.

वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावातील ५८ वर्षीय पुरुष विरार येथून आला आहे. २५ मे रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल काल (२७ मे) रात्री प्राप्त झाला आहे. याच तालुक्यातील उंबर्डे गावातील रुग्ण पनवेल येथून आला आहे. त्याचा स्वॅब २६ मे रोजी घेण्यात आला होता. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावातील दोन रुग्ण पालघर, विरार येथून आले आहेत. त्यांचाही स्वॅब २६ मे रोजी घेण्यात आला होता. त्यांचे अहवाल आज (२८ मे) दुपारी प्राप्त झाले आहेत. या सर्वांना जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. सध्या या सर्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असून, त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील ब्राह्मणदेववाडी, घोगरेवाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदूर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २५ हजार ७२९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून, त्यापैकी ४०७ व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. २४ हजार २६६ व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रामध्ये एक हजार ५६ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून २८ मेपर्यंत एकूण ४८ हजार २०० व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

अलगीकरणाच्या कालावधीत घट
अलगीकरणाचा कालावधी कमी करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. त्यानुसार आता अलगीकरणाचा कालावधी १४ दिवस असेल. बाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना १४ दिवसांचे संस्थात्मक अलगीकरण व इतर क्षेत्रातून आलेल्यांना १४ दिवसांचे गृह अलगीकरण असणार आहे. तसेच गृह अलगीकरणाबाबतच्या सूचनांचे एखाद्या व्यक्तीने पालन न केल्यास पहिल्यांदा ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा सूचनांचा भंग केल्यास एक हजार रुपये दंड करून त्या व्यक्तीस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply