रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील विषाणू प्रयोगशाळा म्हणजेच करोनाविषयक चाचणीची तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) नऊ जून रोजी दुपारी मुंबईतून रिमोट कंट्रोलद्वारे या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाच्या तपासणीसाठी रुग्णांच्या स्वॅबचे नमुने मिरज किंवा कोल्हापूर येथील प्रयोगशाळेकडे पाठवले जात होते. त्यामुळे अहवाल यायला विलंब होत होता. काही रुग्णांचा करोनाचे निदान होण्यापूर्वीच मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजुरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्यासाठी एक कोटी ७ लाख रुपये खर्च आला आहे. त्यातील यंत्रे आणि उपकरणांसाठी ८० लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी १५ लाखांचा खर्च झाला. प्रयोगशाळेकरिता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायलाही मंजुरी देण्यात आली आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या स्वॅबची तपासणी या प्रयोगशाळेत होईल. दररोज २०० नमुने तपासणीची या प्रयोगशाळेची क्षमता आहे.
प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, प्रयोगशाळा सुरू झाल्याने आरोग्यविषयक मूलभूत सुविधेत वाढ झाली आहे. यापुढे करोनाविषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्हयातील सर्वांना फायदा होणार आहे. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे. त्याचा प्रस्ताव सादर करावा. तेही मंजूर केले जाईल. अतिशय गतिमान पद्धतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
लॉकडाऊनचा उपयोग आरोग्यसुविधांची वाढ करण्यासाठी करण्याचे धोरण ठेवून राज्यात काम सुरू आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोव्हिड-१९ चे संकट सुरू झाले, त्यावेळी राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या. आता ही संख्या ८५ झाली आहे. संकटाचे रूपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना करोनाविषयक तपासणीसाठी फार दूर जावे लागू नये, यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दरदेखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे सरकारचे यापुढील काम असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नागिरीत प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने कोव्हिडनंतर विषाणूने होणाऱ्या एचआयव्ही, जेनेटिक ओळख आदी तसेच कर्करोगाच्या चाचण्यादेखील करणे रत्नागिरीत शक्य होणार आहे. यासाठी ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजुरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरू झाली, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव प्रदीप व्यास मुंबईतून तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि प्रसाद लाड रत्नागिरीतून आणि आमदार भास्कर जाधव चिपळूणमधून या कार्यक्रमात सहभागी झाले.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. रिमोटने उद्घाटन झाल्यावर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत तयार करण्यात आलेला एक वृत्तपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रसारणही करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी उपस्थित होते. कान्हुराज बगाटे यांनी आभार मानले.
…….
विषाणू प्रयोगशाळा
……..
उद्घाटन समारंभ

One comment