रत्नागिरीत आतापर्यंत १७३ रुग्ण बरे होऊन घरी; सिंधुदुर्गात २२ जणांची करोनावर मात

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (आठ जून) दिवसभरात सहा करोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत घरी सोडलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. रत्नागिरीत आत्ता १७७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून, १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावत विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्या (नऊ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.

रत्नागिरीतील स्थिती
आज (आठ जून) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात तिघांचे करोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३६४ झाली आहे. तीन जून रोजी कामथे येथे मरण पावलेल्या रुग्णाचा अहवाल आज मिळाला. तो रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातीव मृतांची संख्या आता १४ झाली आहे. आज अहवाल मिळालेल्या इतर दोन बाधितांपैकी एक रुग्ण संगमेश्वरचा आणि एक रत्नागिरीचा आहे.

आज दिवसभरात सहा रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १७३ झाली असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १७७ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ७६ रुग्ण असून, जिल्हा रुग्णालयात ४५, समाजकल्याण भवन कोव्हिड केअर सेंटरमध्ये ५, कामथे उपजिल्हा रुग्णालयात ८, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १०, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये एक, गुहागर ग्रामीण रुग्णालयात २, वेळणेश्वर कोव्हिड केअर सेंटरमध्ये एक, दापोली केकेव्ही कोव्हिड केअर सेंटरमध्ये २, तर संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात २ रुग्ण आहेत. मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर अशा होम क्वारंटाइन असणाऱ्यांची संख्या ६२ हजार ९५ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये मळेवाड (ता. सावंतवाडी) येथील एक, तळगाव (मालवण) येथील एक, आसोली (वेंगुर्ला) एक, कणकवली तालुक्यातील तळेरे येथील एक व घोणसरी येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२७ झाली आहे. त्यापैकी २२ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण उपचारांसाठी मुंबईला गेला आहे. सध्या १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply