रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (नऊ जून) आणखी तीन करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांच्यासह रुग्णांची एकूण संख्या ३६७ झाली आहे. बरे झालेल्या ११ करोनाबाधित रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत घरी पाठविलेल्या रुग्णांची संख्या १९५ झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये १५८ रुग्ण उपचारांखाली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजारी रुग्णांपेक्षा अधिक आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३० झाली आहे. तसेच, सिंधुदुर्गातही आता करोनाच्या चाचण्या होणार आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
दिवसभरात ११ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. त्यांचा तपशील असा – रत्नागिरी जिल्हा रुग्णालय १, संगमेश्वर ४, कोव्हिड केअर सेंटर, सामाजिक न्याय भवन, रत्नागिरी – ३, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड – ३. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ६६ ठिकाणे करोनाबाधित क्षेत्रे म्हणून जाहीर झाली आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी – ९, गुहागर – ५, खेड – ६, संगमेश्वर – ७, दापोली – ९, लांजा – ६, चिपळूण – १४, राजापूर – १०.
संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ६९ जणांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय – २७, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – ११, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ८, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – ३, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टीट्यूट, लवेल, खेड – १४, ग्रामीण रुग्णालय, गुहागर- २, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर – १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – १, ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर- २.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या पाच हजारांनी घटली असून ती आता ५७ हजार ९३० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २५ हजार ६९९ चाकरमानी परराज्य किंवा जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ५४ हजार ६४३ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाला काल (आठ जून) रोजी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कट्टा, मालवण येथील एक, मळेवाड, सावंतवाडी येथील एक आणि ओवळिये सावंतवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १३० झाली आहे. त्यापैकी ३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण ८३ हजार ८४६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

टीबीच्या निदानासाठी वापरले जाणारे CBNAAT मशीन, तसेच TRUENAAT हे मशीन करोनाचे निदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वापरले जाणार आहे. या वापरास आयसीएमआरने मंजुरी दिली आहे. ही मशीन्स सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर यांनी त्याची पाहणी केली. (वरील फोटो)
(रत्नागिरी जिल्ह्यात आज अद्ययावत विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. तेथे करोनासह अन्य विषाणूजन्य रोगांचे निदान होणार आहे. त्या संदर्भातील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
