रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१४ जून) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे १६ रुग्ण वाढले असून, १२ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले, तर उपचारांदरम्यान ६७ वर्षांच्या एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात पाच नव्या रुग्णांची भर पडली असून, १६ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीत स्वॅब तपासणीसाठी आलेल्या आठ रुग्णांचे अहवाल दिवसभरात पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कालपासून पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या सायंकाळी १६ झाली. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ४१८ आहे. बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेल्या कालपासूनच्या रुग्णांची संख्या १२ आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या एकूण २९१ झाली असून, एकूण मृतांची संख्या आता १७ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ११० रुग्ण उपचार घेत आहेत.
गेल्या २४ तासांत सापडलेल्या बाधितांचे विवरण असे – रत्नागिरी १०, संगमेश्वर २, कळंबणी २, राजापूर १ आणि कामथे १.
गेल्या २४ तासांत बरे झालेल्यांचे विवरण असे – कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ५, जिल्हा रुग्णालय १, वेळणेश्वर २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लोटे २ आणि कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी २.
मुंबईतून आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील एका रुग्णाचा आज (१४ जून) दुपारी मृत्यू झाला. या ६७ वर्षीय रुग्णाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहदेखील होता.
………
सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत पाच जणांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १५४ झाली आहे. जिल्ह्यातील आणखी १६ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना आज (१४ जून) घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ८४ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
