‘निसर्ग’मुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान; ‘जीआय’ १० वर्षे लांबणार

रत्नागिरी : गेल्या तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुपारीची लागवडच उद्ध्वस्त झाल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपारीच्या श्रीवर्धनी प्रजातीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळवून देण्याची प्रक्रिया तर तब्बल दहा वर्षे लांबणार आहे. त्यामुळे विद्यापीठाबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होणार आहे.

निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले. नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या पिकांची लवकर भरून न येणारी हानी झाली आहे. पुढील काही वर्षे शेतकऱ्यांना कोणतेही उत्पन्न मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या श्रीवर्धन (जि. रायगड) येथील सुपारी संशोधन केंद्राचाही समावेश आहे. या केंद्राला प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. संशोधन केंद्रातील लागवड पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

श्रीवर्धन (जि. रायगड) येथील हे सुपारी संशोधन केंद्र १९६५ साली सुरू झाले. तेव्हापासून कोकणातील सुपारी बागायतदारांसाठी या केंद्रात संशोधन केले जाते. या केंद्रात झालेल्या संशोधनानंतर कोकणातील शेतकऱ्यांसाठी श्रीवर्धनी ही भरपूर उत्पन्न देणारी जात विकसित करण्यात आली. तसेच त्या सुपारीच्या जातीच्या रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ती पोहोचविण्यात आली. श्रीवर्धनी सुपारीच्या जातीचे भौगोलिक मानांकन (म्हणजेच जीआय) घ्यावयाची प्रक्रिया सुरू असतानाच चक्रीवादळ झाल्याने आता ती प्रक्रिया ठप्प झाली आहे. संशोधन केंद्रातील सुपारीची सारे ९० टक्के झाडे उन्मळून पडली. त्यामुळे जुनी बाग संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. परिणामी नवी लागवड करून पुन्हा नव्याने संशोधन करून ‘जीआय’ची प्रक्रिया पुन्हा पार पाडण्यासाठी किमान दहा वर्षे लागणार आहेत.

केंद्रावरील सुपारी संशोधनाचे काम ठप्प झाले असून, येत्या पाच-सहा वर्षांत या केंद्राला उत्पन्नही मिळणार नाही. याचा विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नावर विपरीत परिणाम होईलच; पण सुपारीच्या संशोधनासाठी नव्याने प्रयोग करावे लागणार आहेत.

नव्या संशोधन केंद्रासाठी दिवेआगर (जि. रायगड) येथील जागा विद्यापीठाने सुचविली आहे. ती जागा शासनाने सुपारी संशोधन केंद्रासाठी उपलब्ध करून दिल्यास संशोधन नव्याने सुरळीतपणे करण्यासाठी मदत होईल, अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे.
………………….

अधिक माहितीसाठी आणि व्हॉट्सअॅपवर ऑर्डर नोंदवण्यासाठी https://wa.me/919850893619
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply