रत्नागिरी : करोनाविषयक लॉकडाउनच्या काळात कलाकारांच्या कलाविष्काराला वाव मिळावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या कलाप्रेमी फेसबुक पेजतर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने अभंग गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २१ जूनपर्यंत स्पर्धेसाठी अभंगांचे व्हिडिओ पाठविता येतील.
लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. कोणालाच घराबाहेर पडणे शक्य नसल्याने कलाकारही आपली कला सादर करू शकले नाहीत. रसिक-श्रोतेही उत्तमोत्तम कार्यक्रमांना मुकले. या पार्श्वभूमीवर सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, लोकांचे मनोरंजन करावे आणि त्याचबरोबर कलाकारांना जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणारे एक व्यासपीठ तयार करावे, म्हणून उदय गोखले यांच्यासह रत्नागिरीतील कलाकारांनी कलाप्रेमी फेसबुक पेज तयार केले. गीत रामायणाचा विवेकार्थ किंवा अर्घ्य तुज भास्करा, संवाद कट्टा यासारखे उपक्रम सादर करण्यात आले. त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. काही प्रचलित – अप्रचलित कलाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभिवाचन, कथाकथन, काव्य, संगीत, नृत्य, चित्रकला, कार्टून, बुद्धिबळ अशा विविध विषयांवर कार्यक्रम या पेजच्या माध्यमातून झाले. अनेक कलाकारांचं सहकार्य आणि रसिकांचा प्रतिसाद कलाप्रेमी पेजला मिळाला. या पेजला फक्त दोन महिन्यांत देशविदेशातील सुमारे आठ हजार फॉलोअर्स मिळाले आहेत.
हे पेज लॉकडाउन काळापुरतेच मर्यादित न ठेवता ह्यावर आणखी नवीन उत्तमोत्तम कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे, असे उदय गोखले ह्यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीनिमित्त या पेजवरून मराठी अभंग गायन स्पर्धा आयोजित केली असून, त्याला जगभरातील स्पर्धकांचा प्रतिसाद मिळत आहे, असे अभिजित भट यांनी सांगितले. या स्पर्धेकरिता व्हिडिओ पाठवण्याची २१ जून ही अंतिम तारीख आहे. बाकी तपशील कलाप्रेमी पेजवर पाहता येईल, असे विवेक सोहनी यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी दोनशे रुपये प्रवेश शुल्क असून कलाकारांनी आपल्या गाण्याचा व्हिडीओ कलाप्रेमीपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. स्पर्धा तीन गटांत असून पहिला वयोगट ११ ते १६ वर्षे, दुसरा वयोगट १७ ते ३५ वर्षे आणि तिसरा ३६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कलाकारांसाठी खुला गट असेल. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि ई-प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
अभंग स्पर्धेला स्थानिक तसेच रत्नागिरीबाहेरीलही कलाकारांनी उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कलाप्रेमीतर्फे उदय गोखले, अभिजित भट आणि विवेक सोहनी यांनी केले आहे.
पेजची लिंक https://www.facebook.com/artistsharmony/
………………………
