रत्नागिरी : काही तासांसाठी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागातील वीजयंत्रणाच भुईसपाट केली. गेले बारा दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामुळे बाधित ४७ उपकेंद्रांपैकी ४६ उपकेंद्रे सुरू झाली असून, राहिलेल्या एकमेव केळशीफाटा (ता. मंडणगड) उपकेंद्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. आतापर्यंत तीन लाख ८५ हजार ६२३ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यातून महावितरणला सावरण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून कोकणात मनुष्यबळ आणि विजेचे साहित्य पोहोचले. रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणचे २११ आणि ठेकदारांचे ४३५ अशा कामगारांची अतिरिक्त कुमक सध्या कार्यरत आहे. हे सर्व मनुष्यबळ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आल्याने आतापर्यंत १७५ फीडर्स आणि त्यावरील ५८० गावांपर्यंतचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश मिळाले आहे. त्यासाठी उच्च दाबाचे ३६४ आणि लघु दाबाचे ५५३ खांब उभे करून चार हजार ९७६ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू केला आहे. आतापर्यंत बाधित चार लाख २१ हजार ३६१ ग्राहकांपैकी तीन लाख ८५ हजार ६२३ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला आहे. राहिलेल्या १३ फीडर्सवरील ३२ हजार ७०५ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे.
…………………
