दृष्टी नसली म्हणून काय झालं… तिची जिद्द उत्तुंग आहे!

सुजाता कोंडीकिरे ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (पूर्व) शाखेत अधिकारी आहे. तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या व्यवसायवृद्धीची जबाबदारी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात तिने एसबीआय लाइफचा ५० लाख रुपयांचा, तर २०१९-२० या वर्षात एक कोटी रुपयांचा व्यवसाय करून तिला दिलेले उद्दिष्ट साध्य केलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर तिने अंबरनाथ येथे बँकेचे गृहकर्ज काढून फ्लॅटपण खरेदी केला आहे. हे सर्व वाचून आपल्याला असं वाटेल, की यात काय मोठंसं? किती तरी मुलं-मुली असं सर्व करून दाखवतात. तिने केलं तर काय विशेष? पण सुजाताने जे काही करून दाखवलं आहे, ते विशेषच आहे. कारण तिने तिच्या पूर्ण अंधत्ववर, अंधत्वाने आलेल्या नैराश्यावर मात करत हे यश मिळवलं आहे. तिची कहाणी खूप प्रेरक आहे.

सुजाता कोंडीकिरे हिचे वडील बाळासाहेब पोटापाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणापूर हे गाव सोडून अंबरनाथला आले. एका कंपनीत काम करू लागले. आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती; पण त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं. नातेवाईकांचं म्हणणं न ऐकता त्यांनी तिन्ही मुलींना व मुलाला उच्च शिक्षण दिलं. सुजाताचं प्राथमिक शिक्षण अंबरनाथ येथील भगिनी मंडळ शाळेत, तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झालं. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सुजाताला अकरावीसाठी सांगली येथे मावशीकडे जावं लागलं. तिथे एकदा पहाटे फिरताना अंधारात तिला मोठे झाड लागले. क्षणार्धात तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. तिची दृष्टी गेली. डोळे चांगले होते; पण डोळ्यांपासून मेंदूला दृश्य पोहोचवणारी नस खराब झाली होती. त्यानंतर दोन महिने उपचार घेतल्यावर तिला परत दिसू लागलं. सुजाताने २००२मध्ये अर्थशास्त्र विषयात बीए केलं. तिला बीएड करायचं होतं; पण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही.

तिने एका खाजगी कंपनीत पॅनेल असेंम्बलिंगचं आणि स्टोअरकीपरचं काम मिळवलं. पैसे वाचवून तिने बीएड करायचं ठरवलं होतं; पण २००५च्या अखेरीस तिची दृष्टी पुन्हा जाऊ लागली. त्यामुळे तिला ते काम सोडावं लागलं. २७व्या वर्षी तर तिची दृष्टी पूर्णपणे गेली. तिला काहीच करता येणं अशक्य झालं. अशा वेळी मदत करायची सोडून नातेवाईक मात्र “तू अंध झाल्याने, आता काही करू शकणार नाहीस, घरच्यांवर बोजा बनून जगण्यापेक्षा जीव दे” असं सरळ सांगायचे. सुजाताचाही धीर खचून तिच्या डोक्यात जीव देण्याचे विचार यायचे. ती आईला सारखी म्हणायची, “मला विष आणून दे, मी मरून जाते, मला जगायचं नाही.”

पण तिची आई तिला सतत धीर द्यायची. आईने सुजाताला जगण्याचं बळ दिलं. डॉ. गौतम जटाले यांच्याकडे तिने मानसोपचार घेतले. त्यांनी तिला तिचं अंधत्व स्वीकारण्यास तयार केलं. पुढे सुजाता मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्कूल ऑफ ब्लाइंड या संस्थेत ब्रेल लिपी शिकली. तिथे तिने संगणक प्रशिक्षण घेऊन एमएससीआयटी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अंधांसाठी असलेल्या संगणक प्रणाली आत्मसात केल्या. तिथे तिला विविध स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच असा निर्धार तिने केला होता. तीन वर्षं ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकेच्या स्पर्धा परीक्षा देत राहिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षकाच्या पहिल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली; पण दुसऱ्या परीक्षेचं पत्र तिला ती परीक्षा झाल्यावर मिळाल्याने ती संधी हुकली. पण ती निराश झाली नाही. परीक्षा देत राहिली. अंतिमतः २०१५मध्ये तिची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये झाली.

सुजाताने दृष्टी नसल्याने सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास रेडिओ आणि विविध वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम ऐकून केला. तसंच वरळीत तिला शिकवायला येणारे संजय मोरे सर, भरत पांडे सर तिला दूरध्वनीवरून मार्गदर्शन करत. सुजाताची आई, सुजाता सांगेल त्याप्रमाणे नोट्स लिहून घ्यायची. अभ्यासात सतत सुजाताला सोबत करायची. सुजाताच्या वडिलांना २०११मध्ये अर्धांगवायू झाला. त्यामुळे ते काही नोकरी, व्यवसाय करू शकत नव्हते. तिच्या बँकेच्या परीक्षेदरम्यान त्यांचं निधन झालं. अशा दुःखी परिस्थितीत तिने बँकेची लेखी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागला. त्यात ती उत्तीर्ण झाली. बँकेच्या मुख्यालयात तिची मुलाखत झाली. तिची निवड झाल्याचं नेटवरून तिला कळलं, त्या वेळेस तिचा विश्वासच बसेना.

त्या वर्षी पूर्ण भारतात सात अंध निवडले गेले होते. त्यात सुजाता एकमेव मुलगी होती. त्यात महाराष्ट्रातून निवडली गेलेली ती एकमेव उमेदवार होती. सुजाता २०१५मध्ये बँकेच्या डोंबिवली शाखेत रुजू झाली. अतिशय सक्षमपणे ती आपली सेवा बजावत आहे. मिळालेल्या यशावर समाधान न मानता आता तिची पुढील पदोन्नतीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. सुजाताने एक धाडसी निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, तिला यापुढे दिसू शकणार नाही, म्हणून तिचे डोळे दान करण्याचं तिनं ठरवलं आहे. मार्च २०१७मध्ये मनीष राजपूत या डोळस तरुणाशी तिचा थाटामाटात विवाह झाला. डोळ्यांचे डॉक्टर सोनल शहा, मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर गौतम जटाले, वडिलांच्या आजारपणात व त्यांच्या मृत्यूनंतर साथ देणारी बहीण ज्योती, तिचे पती संजय भंडारे यांच्याविषयी सुजाता खूप कृतज्ञता व्यक्त करते. अंधारातून प्रकाशाकडे निघालेल्या सुजाताला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

देवेंद्र भुजबळ (९८६९४८४८००)
…………

SURGICOMFORT Non Woven Elastic Ear-Loop Disposable Face Mask, 100 Pieces Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply