सिंधुदुर्गातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र तिलारीत; जैवविविधता संवर्धनासह इको टुरिझमला चालना

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात २९.५३ चौरस किलोमीटर क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र असून, पश्चिम घाटातील १३वे संरक्षित क्षेत्र झाले आहे. त्यामुळे जैवविविधता संवर्धनासह इको टुरिझमला चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी घेतलेल्या बैठकीत या संदर्भात घोषणा केली होती. वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगलासह इको टुरिझम प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार आता हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित झाले आहे. या परिसरात वाघ, हत्ती, बिबट्या, गवा सांबर, पिसोरी, भेडकी, चौशिंगा आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर समृद्ध आहे. वन्यजीवांचा हा अधिवास संरक्षित होण्याच्या दृष्टीने या परिसराला संवर्धन राखीव घोषित करणे गरजेचे होते. नुकत्याच निर्गमित झालेल्या अधिसूचनेद्वारे त्यास मान्यता मिळाली असून, आता जैवविविधता जपतानाच या क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल.

‘राज्याचा विकास करताना राज्याच्या वन वैभवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विकास आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे, तसेच जैवविविधतेचे रक्षण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असून, राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याला शासनाचे प्राधान्य राहणार आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अधिसूचनेनंतर आता हे क्षेत्र ‘तिलारी संवर्धन राखीव’ या नावाने ओळखले जाईल. याचे एकूण क्षेत्र २९५३.३७७ हेक्टर म्हणजेच २९.५३ चौ. कि. मी इतके राहणार आहे. निर्गमित झालेल्या अधिसूचनेन्वये तिलारी राखीव क्षेत्राच्या चतु:सीमादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. तिलारी संवर्धनाच्या व्यवस्थापनासाठी राज्य शासन एक समिती स्थापन करणार आहे. दोडामार्ग वन परिक्षेत्रातील या संवर्धन राखीव क्षेत्रात बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे खु., केंद्रे बु., पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे, मेढे या गावांतील काही क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव
तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून, यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. तिलारी हे पश्चिम घाटातील १३वे संरक्षित क्षेत्र झाले आहे. तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रात निम सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय दमट पाणथळीची वने आहेत. पश्चिम घाटातील हा प्रदेश निसर्गाचा मौल्यवान ठेवा असून, येथे विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी, कीटक, फुले व फुलपाखरे दिसून येतात. एवढेच नाही, तर कित्येक वनस्पती आणि प्राणी जगात फक्त येथेच आढळून येतात.

तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर आहे. गोव्यातील म्हादेई अभयारण्य, कर्नाटकातील भीमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन ही तीन क्षेत्रे वन्य प्राण्यांच्या दृष्टीने, विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून आधीच घोषित करण्यात आला आहे. आता तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या घोषणेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनवैभवाची जपणूक होणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार संधींची उपलब्धताही होईल.
………….

SURGICOMFORT Non Woven Elastic Ear-Loop Disposable Face Mask, 100 Pieces Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply