यंदा गणेशमूर्तींची उंची तीन फुटांपर्यंतच : उदय सामंत

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींची उंची जास्तीत जास्त तीन फुटांपर्यंतच ठेवायचा निर्णय झाला आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीनंतर काही निर्णय जाहीर केले. त्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. गणेश आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशमूर्तीही तीन फुटांपेक्षा अधिक उंचीच्या असणार नाहीत. उत्सव साजरा होणार असला, तरी करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उत्सवाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी गणेशभक्तांना ऑनलाइन दर्शन देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. आरतीही ऑनलाइनच होईल. घरगुती उत्सवही मार्गदर्शक सूचनांनुसार साधेपणाने साजरा करावयाचा आहे. गर्दीची शक्यता लक्षात घेता यावर्षी रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर होणारा सार्वजनिक दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

गणेशोत्सवाला मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांविषयी विचारले असता श्री. सामंत म्हणाले की, यावर्षी होळीपासूनच अनेक चाकरमानी गावागावात आलेले आहेत. त्यापैकी अनेक जण परत जाऊ शकलेले नाहीत. त्याशिवाय करोनाच्या संकटात रत्नागिरी जिल्यात दोन लाख २० हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख ८० हजार चाकरमानी दाखल झालेले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये फार तर आणखी ८० हजार चाकरमानी येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र करोनाचे निकष आणि जिल्हाप्रवेशाचे नियम पाळूनच त्यांना परवानगी दिली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
……..

AARTI SANGRAHA आरती संग्रह (Marathi Edition) श्री गणपती पूजाविधी – माहिती: Shri. Ganpati Poojavidhi (Marathi Edition) Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply