रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जून) सलग तिसऱ्या दिवशी करोनाचे दोन बळी गेले आहेत. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २३ झाली आहे. आज जिल्ह्यात नवे १० रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ४९४ झाली आहे. बरे झालेले ३६३ रुग्ण लक्षात घेता बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के झाले आहे. पुन्हा दाखल झालेल्या एका रुग्णासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १०९ जण उपचारांखाली आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून १८ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तेथील करोनाबाधितांची एकूण संख्या १७८वर गेली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
जिल्ह्यात काल (२२ जून) सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कालपासून कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण, रत्नागिरी येथून एक, जिल्हा रुग्णालयातून २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल एक, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली एक अशा एकूण पाच रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६३ झाली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयामध्ये आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये चिपळूण येथील बहादूरशेख नाका भागातील पुरुष (वय ७२) आणि शिवतर, ता. खेड येथील पुरुष (वय ४४) यांचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या करोनाबाधितांची संख्या २३ झाली आहे.
काल सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार दहा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – आडे, ता. दापोली-१, दाभोळ, ता. दापोली-२, कडवई, ता. संगमेश्वर-१, अंधेरी, कारभाटले, ता. संगमेश्वर-१, तिवरेवाडी, संगमेश्वर-१, इसवली, ता. लांजा-१, निवळीफाटा, हातखंबा, ता. रत्नागिरी-१, पश्चिम बंगाल -१, मिळंद, राजापूर – १.
सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०९ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
मुंबईसह एम. एम. आर. क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइनमध्ये असलेल्यांची संख्या आणखी घटली असून, ती आता २९ हजार ९१८ इतकी झाली आहे. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत (२२ जून) एकूण एक लाख ४९ हजार ३६९ चाकरमानी दाखल झाले आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांची संख्या ७४ हजार ९२५ आहे.
………
सिंधुदुर्गातील परिस्थिती
आज (२३ जून) जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, काल उशिराही सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७८ झाली असून, त्यापैकी सध्या २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४५ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख सहा हजार १५८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
…………
