सिंधुदुर्गात आता फक्त १२ करोनाबाधित; रत्नागिरीत १०६ रुग्णांवर उपचार सुरू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनावर मात केलेल्या आणखी १३ रुग्णांना आज (२२ जून) डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत सिंधुदुर्गात केवळ १२ करोनाबाधित आहेत. रत्नागिरीत सध्या उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या १०६ असून, दोन जणांचा आज मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आज (२२ जून) झाली. दरम्यान, रत्नागिरीतील करोनाविषयक तपासणी यंत्रामध्ये बिघाड झाल्याने गेल्या २४ तासांत नवे अहवाल उपलब्ध नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली.

कालपासून कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण, रत्नागिरी येथून सात रुग्णांना, तर जिल्हा रुग्णालयातून दोन अशा एकूण ९ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३५८ झाली आहे.  आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील पुरुष रुग्णाला (वय ६५) मूत्रपिंड आणि मधुमेहाचा आजार होता. काडवली (ता. संगमेश्वर) येथील महिला रुग्णाचाही (वय ४२) उपचारादरम्यान मृत्यू झाला.  दोन्ही रुग्णांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या २१ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०६ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८४ करोनाबाधित आढळले असून, बरे झालेल्यांची संख्या ३५८ आहे.
……….
सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गातील आणखी १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४३ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या १६० होती. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबईत गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख सहा हजार १५८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
……………….
(अपडेट्ससाठी कोकण मीडियाला सोशल मीडियावर फॉलो करा…)

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply