वीजबिल अधिक आले आहे असे वाटते का? तुम्हीच पाहा पडताळून..

रत्नागिरी : महावितरणतर्फे सध्या दिले जात असलेले बिल अतिरिक्त असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिल समजून घ्यावे. कोणाही ग्राहकाला आपले बिल पडताळून पाहता येईल, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

करोनाप्रतिबंधक लॉकाडाउनमुळे गेल्या २३ मार्चपासून मीटर रीडिंग बंद करण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. मात्र ग्राहकांना त्या कालावधीतील बिल देताना विविध बाबींचा विचार केला असून अत्यंत अचूक बिल देण्यात येत असल्याचा खुलासा महावितरणने केला आहे. त्यासाठी मार्गदर्शक माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या ग्राहकाला ३ महिन्यांसाठी ६१२ युनिट वापराचे वीज बिल आलेले असेल तर ५०० युनिटच्या वरील स्लॅब (११.७१ रुपये)लागलेला नसतो. हा स्लॅब लागलेला असेल तर वीज आकार ७१६६.५२ रुपये झाला असता किंवा ६१२ युनिट भागिले ३ महिने म्हणजे दरमहा २०४ युनिट असा हिशेब केला, रत २०४ युनिटला १०० च्या वरील स्लॅब लागलेला नसतो. कारण तसे झाले असते तर (२०४ युनिट × ७.४६ दर × ३ महिने) वीज आकार ४५६५.५२ रुपये झाला असता. मात्र वरील दोन्ही प्रकारे वीज आकार ठरत नसून आपण जेवढ्या महिन्यासाठी वापर केला तेवढ्या महिन्यासाठी वीज आकार स्लॅब आणि युनिटमध्ये विभागून बिल दिले जाते. वरच्या उदाहरणानुसार वीज आकार दरमहा २०४ युनिट अशा हिशेबाने घेतला जातो. त्यातही २०४ युनिटला सरसकट १०० च्या वरील स्लॅब न लावता खालीलप्रमाणे आकारणी होते. जसे – पहिल्या स्लॅबमध्ये १०० युनिट म्हणजे १०० × ३.४६ प्रतियुनिट दर = ३४६ रुपये. दुसऱ्या स्लॅबमध्ये उरलेले १०४ युनिट म्हणजे १०४ × ७.४३ प्रतियुनिट दर = ७७२.७२ रुपये. पहिल्या आणि दुसऱ्या स्लॅबची बेरीज (३४६ + ७७२.७२)= १११८.७२ रुपये एवढे बिल होते. अशा प्रकारे एका महिन्याची रक्कम काढून त्याला ३ महिन्यांचे बिल असल्याने ३ ने गुणले जाते. (१११८.७२× ३ महिने = ३३५६.१६ रुपये).

म्हणजेच वीज आकार ७१६६.५३ किंवा ४५६५.५३ आकारला नाही, तर तो केवळ ३३५६.१६ रुपये असा आकारला गेला.

यासोबतच या तीन महिन्यांच्या आलेल्या रकमेतून मागील सरासरी बिलाची रक्कमदेखील वजा केली जाते. उदा. – समजा याआधी आपल्याला दोन महिने ५००-५०० रुपये असे सरासरी बिल आले असेल तर ती रक्कम या ३ महिन्यांच्या आलेल्या रकमेतून वजा होते. (सरासरी बिलातील स्थिर आकार व त्यावरील वीज शुल्काची रक्कम सोडून. तसेच एक एप्रिलपासून नवीन वीजदर लागू झाले आहेत. तसेच आपल्या बिलांवर चालू रीडिंग दर्शविले असते, तेथे त्याच्या खाली ३१ मार्च २०२० पूर्वीचे युनिट काढून दिलेले आहेत आणि तेवढ्या युनिटवर जुने वीज दर लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोठेही ग्राहकांचे नुकसान झालेले नाही किंवा बिल चुकलेले नाही. फक्त आपले मीटर रीडिंग चुकले असेल, तरच आपले बिल चुकीचे आकारले जाऊ शकते. त्यामुळे रीडिंग चुकीचे घेतले गेले असेल तर निदर्शनास आणून द्यावे, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांना बिल समजून घ्यायचे असेल तर https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपली माहिती पाहावी, असे सूचित करण्यात आले आहे.

………………….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply