रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : करोनावर मात केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १३ रुग्णांना आज (२१ जून) घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५१, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३० झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे करोनाची बाधा झाल्याने मरण पावलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १९ झाली आहे. दरम्यान, आज (२१ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात करोनाबाधितांमध्ये आणखी आठ जणांची भर पडली असून, जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४८४ झाली आहे. सध्या रुग्णालयात असलेल्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात काल सायंकाळपासून आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये कादिवलीचे दोन, गोळप येथील एक, ओसवालनगर (रत्नागिरी) येथील एक, गणपतीपुळे येथील एक, निवळी (ता. चिपळूण) येथील एक, खांदाटपाली ( चिपळूण) साळवीवाडी, असुर्डे (ता. चिपळूण) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ही माहिती रुग्णांनी दाखल होताना नोंदविलेल्या पत्त्यानुसार आहे, असे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
आज कोव्हिड केअर सेंटर (समाजकल्याण, रत्नागिरी) येथून दोन रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७२ टक्के आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कापडगाव येथील पुरुष रुग्णाला (५३ वर्षे) मधुमेहाचा आजार होता. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले होते. भिले-कुंभारवाडी (ता. चिपळूण) येथील महिला रुग्णालाही (७० वर्षे)मधुमेहाचा आजार होता. या महिलेस महिला कक्षात ठेवण्यात आलेले होते. त्या दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्यांची संख्या १९ झाली आहे.
आज (२१ जून) सायंकाळची जिल्ह्यातील करोनाविषयक स्थिती अशी – एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – ४८४, बरे झालेले रुग्ण – ३५१, मृत्यू – १९, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – ११५ (त्यात एक रुग्ण पुन्हा भरती झालेला आहे.)
जिल्ह्यात सध्या ५१ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १२ गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये एक, खेड तालुक्यात नऊ गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात एक, दापोलीमध्ये सात गावांमध्ये, लांजा तालुक्यात पाच, चिपळूण तालुक्यात १० गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात पाच, तसेच मंडणगडमधील एका गावात असे कंटेन्मेंट झोन आहेत.
…………
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३० झाली आहे. जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १६० असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आज अखेर एकूण एक लाख चार हजार ८९६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

…………………………