देवरूख : एसटीच्या येथील आगारातर्फे साखरपा ते अर्नाळा या मार्गावर येत्या शनिवारपासून (दि. १९ सप्टेंबर) एसटीची आसन-शयनी बसची नियमित सेवा सुरू होत आहे.
करोनाच्या कालखंडात एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. गणेशोत्सवात जादा फेऱ्या सोडल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांची चांगली सोय झाली होती. गणेशोत्सवानंतर आता ग्रामीण आणि बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एसटीच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. रेल्वेची सेवा अजूनही सुरू झाली नसल्यामुळे अनेक चाकरमान्यांना नियमित एसटी हाच पर्याय आहे. ते लक्षात घेऊन देवरूख आगाराने साखरपा ते अर्नाळा ही गाडी सुरू केली आहे. ही गाडी संगमेश्वर, चिपळूण, पनवेल, ठाणे, बोरिवली, नालासोपारा येथे थांबून कर्नाळ्याला पोहोचेल. ही शयन आणि आसन बस सेवा आहे. ही गाडी दररोज सायंकाळी ६ वाजता साखरपा येथून सुटणार आहे, तर अर्नाळा-साखरपा बस अर्नाळा येथून दररोज सायंकाळी ५.४५ वाजता सुटणार आहे.
या विनावातानुकूलित गाडीत ४५ आसने आहेत. त्यापैकी ३० आसने बसण्यासाठी, तर १५ शयनआसने आहेत. मात्र करोना प्रतिबंधासाठी केवळ २२ प्रवाशांना यातून प्रवास करता येणार आहे. प्रत्येक शयनआसनाला मोबाइल चार्जिंग पॉइंट आणि पंख्याचीही व्यवस्था आहे. साखरपा ते अर्नाळा या प्रवासाचे एका प्रवाशाचे तिकीट ६९५ रुपये आहे. या गाडीत ज्येष्ठ नागरिकासह कोणत्याही सवलतीचे तिकीट मात्र दिले जात नाही
या बससेवेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहाने केले आहे.

