कनेक्ट विथ विद्याभारती अभियानाला शुक्रवारी प्रारंभ

अंबरनाथ : देशभरात २४ हजार विद्यालये आणि ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या विद्याभारती या शैक्षणिक संस्थेच्या कनेक्ट विथ विद्याभारती या उपक्रमाला शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. भारतीय पद्धतीच्या शिक्षणाविषयी आस्था असलेल्या शिक्षणप्रेमींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्याभारती ही सन १९५२ पासून अखिल भारतीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना आहे. देशभरात विद्याभारतीची सुमारे २४ हजार विद्यालये असून त्यातून सुमारे ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये शिशुवाटिका, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, एकशिक्षकी विद्यालये आणि संस्कार केंद्रे यांचा समावेश आहे. भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित परंतु आधुनिकतेचा ध्यास असलेली शिक्षण व्यवस्था तसेच शिक्षणातील सुयोग्य नमुना देण्यासाठी शिशुवाटिका, समग्र विकास आणि पंचकोषाधारित गुरुकुल असे प्रयोग विद्याभारतीद्वारे राबविले जात असून ते यशस्वी होत आहेत. विद्याभारतीच्या कोकण प्रांता द्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये शिशुवाटिका अतुल्य भारत परिचय योजना, विद्यार्थी मार्गदर्शन, वैदिक गणित, विद्वत परिषद, संस्कृती ज्ञान परीक्षा, अध्यापक प्रशिक्षण, पालक प्रबोधन, सुवर्णप्राशन, क्रिया शोध इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. विद्याभारतीतर्फे चिपळूण येथे भारतीय शिक्षा संकुल प्रकल्प राबविला जात आहे.

देशाच्या शिक्षणव्यवस्थेला बदलत्या जागतिक प्रवाहांसोबत नेण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मूलभूत आणि व्यापक बदल होणार आहेत. केजी ते पीजी आणि भारत केंद्रित शिक्षण हा त्यातील मूलभूत बदल असेल. त्याचीच मांडणी गेली अनेक वर्षे विद्याभारती करत आली आहे. नवे शैक्षणिक धोरण आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावणार आहे. यासाठी विद्याभारतीच्या शैक्षणिक चळवळ उभी करण्याच्या प्रयत्नांना समाजाची साथ हवी आहे.

विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज एकत्र येऊन उभी असलेली ही चळवळ विस्तारित होण्यासाठी कनेक्ट विथ विद्याभारती हे अभियान राबविण्यात येत आहे. विद्याभारतीचे सन्माननीय सदस्यत्वही त्यानिमित्ताने दिले जाणार आहे. या सदस्यांना त्यांच्या रुचीप्रमाणे राष्ट्रकार्यात सहभागी होता येऊ शकेल. वार्षिक सन्माननीय सदस्यत्व शुल्क १०० रुपये असून त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी 94220 54962 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्याभारतीचे कोकण प्रांताध्यक्ष प्रदीप पराडकर आणि प्रांत मंत्री संतोष भणगे यांनी केले आहे.

विद्याभारतीच्या कनेक्ट विथ विद्याभारती या अभियानाच्या नोंदणीचा प्रारंभ उद्या (दि. २७ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजता झूम मीटिंगद्वारे होणार आहे. विद्याभारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्रीराम आरावकर यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ होईल. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष, जेएनपीटीचे संचालक नामवंत उद्योजक डॉ. सुरेश हावरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभियानात सहभागी होण्यासाठी तसेच नोंदणीसाठी आयोजित झूम मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी ९४२२०५४९६२ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply