देवरूखच्या सोळजाईची देवदिवाळीची लोटांगण यात्रा रद्द

देवरूख : येथील सोळजाई देवीची दरवर्षी देवदिवाळीला होणारी लोटांगण यात्रा यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेली यात्रा यावर्षी होऊ शकणार नसल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. १५ डिसेंबर रोजी देवदिवाळी आहे.

सोळजाई देवी ही ४४ खेडी आणि १६ गावांची मालकीण आहे. आंबा, प्रभानवल्ली, उक्षी, गोठणे, सावर्डे या गावांपर्यंतचा परिसर देवीच्या अखत्यारीत येतो. नवसाला पावणारी देवी अशी सोळजाईची ख्याती आहे. तेथील लोटांगण यात्रा प्रसिद्ध आहे. नवस बोललेले भाविक नवस पूर्ण करण्यासाठी देवीसमोर लोटांगण घालत मंदिराभोवती पाच फेर्याप पूर्ण करतात. यावेळी हजारो भाविक उपस्थित राहतात. यानिमित्ताने मोठी यात्रा भरते. यावर्षी १५ डिसेंबरला होणारी ही लोटांगण यात्रा रद्द करण्यात आली आहे.

दोनशे वर्षांच्या परंपरेत वादळ, पाऊस असूनही यात्रेत खंड पडला नव्हता. यंदा करोनामुळे त्यात खंड पडला आहे. धार्मिक विधी होऊन लांबूनच देवीचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाहेर कुठलीही दुकाने लागणार नाहीत. भाविकांनी शक्यतो गर्दी करू नये, असे आवाहन गांधी यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला देवस्थानचे संतोष लाड, रवींद्र गीते, प्रकाश शिंदे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply