भारतीय संस्कृतीत निरनिराळे सण, उत्सव साजरे करण्यामागे धार्मिकते बरोबरच वैज्ञानिक भावनाही जोपासल्या गेल्या आहेत. आठ दिवसावर येणाऱ्या शिमगा सणाबद्दलही असे म्हणता येईल. पर्यावरणाचे रक्षण करणारा, स्वच्छता, आरोग्य यांचे रक्षण करणारा आणि एकीचा, सहजीवनाचा संदेश देणारा असा हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. शिमगा सणाला होलिकोत्सवही म्हणतात. यावर्षी मात्र करोनामुळे या उत्सवाने वेगळेच दिवस आणले आहेत, असे म्हटले, तर वावगे ठरू नये.
हा उत्सव साजरा करण्यामागे पूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था असावी असे म्हणता येईल. पूर्वी सरपंचाच्या मानाचा उत्सव म्हणून होळी उत्सव साजरा केला जात असला तरी त्यात गावातील सफाई कामगारातील अगदी खालचा घटक, मैला कामगाराला होळी पेटवण्याचा मान दिला जात असे. नंतर होळीला नैवेद्य दाखवून गावातील बलुतेदारांना भोजन दिले जाई. खान्देशात काही भागात अजूनही अशा प्रथा सुरू असल्या तरी त्यात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. त्यातून महत्त्वाचा समानतेचा संदेश दिला गेला आहे. रंगपंचमीलाही वनस्पतीपासून बनवलेले नैसर्गिक रंग एका मोठ्या भांड्यात ठेवून सर्व स्त्रीपुरुष एकत्र रंग खेळत. सायंकाळी होळीवर निरनिराळे कार्यक्रम होत. त्यातून जनजागृती करण्यात येत असे. यावेळी सर्व जुने हेवेदावे, वैरभाव विसरून एकीने वागत.
कोकणातही गणपतीप्रमाणे होळी उत्सवालाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. कोकणातले श्रमजीवी कामानिमित्त मुंबईत आले, मुंबईकर झाले तरी त्यांचे कोकणातील आपल्या गावावरचे प्रेम कमी झाले नाही. पूर्वी ते कापड गिरण्यांमधून काम करीत. गिरण्या बंद झाल्याने आता त्यांचे कामाचे स्वरूप बदलले आहे. शेतकऱ्यातही होळी उत्सवाला खूप महत्त्व आहे. शेतकऱ्यांची पिके पूर्ण झालेली असतात. त्यामुळे गव्हाच्या ओंब्यांचा नैवेद्य होळीला दाखवतात. तसेच पुरणपोळीच्या नैवेद्यालाही विशेष महत्त्व आहे. श्रीकृष्ण-बलरामाची कथाही पुराणात सांगितली आहे.
कोकणात हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वीपासून मोठ्या श्रद्धापूर्वक अनेक कार्यक्रमांनी हा उत्साह साजरा केला जातो. गावातून पालखी काढली जाते. पौर्णिमेला रात्री उशिरा होळी पेटवली जाते. काही ठिकाणी होळीला तिखट (मांसाहारी) नैवेद्य दाखवला जातो. होळीची चांगली सजावट केली जाते. भोवताली रांगोळ्या काढल्या जातात. काही भागात पालख्यांचा खेळ खेळतात. त्याला पालख्या नाचवणे म्हणतात.
मुंबईत आणि सर्व महाराष्ट्रात यंदा करोनाच्या महामारीने जो धुडगूस घातला आहे, त्याचा होळीच्या उत्सवावर फार मोठा परिणाम झाला आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तर यंदा रत्नागिरीत मुंबईच्या (मूळ कोकणच्या) लोकांनी गावाला येऊ नये, असे बजावले आहे. साधारणत: पुणे, मुंबई भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जातात. त्यांना सरळ येऊ नका, असे सांगितले आहे. सर्व मंदिरांचे पदाधिकारी, विश्वस्त यांना आरटीपीसीआर आणि अँटीजेन तपासणी करण्यास सांगितले आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतानच्या पूजा कराव्यात, पालख्या नाचवू नयेत, जत्रा भरवू नयेत असे सांगितले गेले आहे. धूलिवंदनासाठीही २५ च्यावर माणसे जमवू नयेत, असे स्पष्ट आदेशच जारी केले. म्हणजे पाहा काय दिवस आलेत ते, कोकणातील होळी सण पाहण्यासाठी दरवर्षी आग्रहाने बोलावले जात असे. खास रेल्वे गाड्या, बसेसची व्यवस्था असते. पण यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर असे काही होणार नाही. हे असे का झाले, याचा आपण सामान्य नागरिकांनीच विचार करायला हवा. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वस्तू खरेदी करताना स्वच्छ मालाची खात्री करणे, सतत हात धुणे, रस्त्यात न थुंकणे, आरोग्याचे सर्व नियम पाळणे हेच करोना नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचे उपाय असल्याने मुंबई-पुणेकरांनी यंदा होळीला कोकणात न जाता घरीच राहणे त्यांच्या सुरक्षेचे आहे, असेच आता म्हणण्याची वेळ आली आहे.
- विनायक बेटावदकर, कल्याण
- (९६१९१४८२६०)

