राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतकेंद्रित – प्रदीप पराडकर

ठाणे : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतकेंद्रित असून त्यामुळे नवीन पिढ्या भारताच्या गौरवशाली परंपरेला जोडल्या जातील, असा सार्थ विश्वास विद्याभारती कोकण-मुंबई प्रांताचे अध्यक्ष प्रदीप पराडकर यांनी व्यक्त केला.

विद्या भारती कोकण- मुंबई प्रांतातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन ‘पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गा’च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

‘राष्ट्रीय शिक्षण धोरणा २०२०’ नुसार पहिल्या टप्प्यातील शिशुवर्ग ते दुसरीपर्यंतच्या टप्प्यातील शिक्षणाला ‘पायाभूत शिक्षण’ असे संबोधण्यात येते. त्याअनुषंगाने १२ जुलै ते २० जुलै असे नऊ दिवस ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या वर्गात शिशुकेंद्रित, संस्कारक्षम, आनंददायी आणि क्रियाकलाप आधारित शिक्षण कसे द्यावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातून १३६ शिक्षक, पालक, संस्थाचालक आणि शिक्षणप्रेमी या वर्गात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला विद्याभारती कोकण प्रांत मंत्री संतोष भणगे, महाराष्ट्र- गोवा राज्य शिशुवाटिका प्रमुख आणि बालतज्ज्ञ सदाशिव उपाख्या भाई उपाले, प्रांत उपाध्यक्षा डॉ. मेधा फणसळकर, प्रांत शिशुवाटिका प्रमुख सौ. भावना गवळी, प्रांत कार्यालय प्रमुख सौ. अक्षदा साठे आणि विद्या भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मंत्री मोहन कुलकर्णी उपस्थित होते.

शिक्षणाची गरज चांगला माणूस घडविण्यासाठी आहे. शिक्षण हे अनुभवाधारित, क्रियाधारित आणि आनंददायी असले पाहिजे. त्यासाठी पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांचा उपयोग केला पाहिजे, असे प्रांतमंत्री संतोष भणगे म्हणाले.

भाई उपाले म्हणाले, व्यक्ती ते परमेष्टी साध्य होण्यासाठी शाळा, घर आणि मंदिरे ही भारतीय संस्कार देणारी केंद्रे बनली पाहिजेत. तसेच श्रवण, संभाषण, वाचन (चित्र) आणि लेखन हे बालकाच्या भाषा विकासाचे टप्पे आहेत.

‘पंचकोष विकास’ हे विशेष सत्र डॉ. राजशेखर कार्लेकर, ‘संस्कार’ हे सत्र श्रीमती ज्योतिताई पिटके, तर ‘शैक्षणिक नियोजन’ हे सत्र प्राची केळकर यांनी घेतले होते. या वर्गात प्रांतातील विविध शिशुशाळा शिक्षकांनी क्रियाकलाप सादर केले. यासाठी प्रांत शिशुवाटिका सहप्रमुख नंदिनी भावे यांनी विशेष मेहनत घेतली.

या पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गात बालकांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास कसा करावा, तसेच हसत खेळत शिक्षण देत संगोपन कसे करावे याविषयी उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उपयोग आम्ही आमच्या शिशुशाळांमध्ये करू आणि शिक्षण आनंददायी करू, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थींनी दिली.

संपूर्ण वर्गाचे सूत्रसंचालन सौ. भावना गवळी यांनी केले, तर सौ. प्रगती भावसार यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply