सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या रूपात अवतरला गणेश

रत्नागिरी : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात रत्नागिरीतील मूर्तिकार आशीष संसारे यांनी गणेशमूर्ती साकारली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई करून भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या नीरज चोप्रावरील प्रेम सर्वदूर पोहोचले आहे. विविध आविष्कारांमधून ते व्यक्त होत आहे. रत्नागिरीतील गणेशमूर्तीचा आविष्कारही त्यातून झाला आहे. माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख खूप हौशी असून दरवर्षी वेगवेगळ्या कल्पनेवर आधारित गणेशमूर्ती साकारण्याची त्यांना आवड आहे. याआधी त्यांनी प्रो-कबड्डी सुरू झाल्यावर उंदरांसोबत कबड्डी खेळतानाचा गणपती, झाड लावताना गणपती अशा वेगवेगळ्या स्वरूपातील गणेशमूर्ती संसारे यांच्याकडून साकारून घेतल्या आहेत. यंदा सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती साकारावी, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी ही संकल्पना मूर्तिकार आशीष संसारे यांना बोलून दाखविली. त्यानुसार श्री. संसारे यांनी नीरजच्या स्वरूपातील भालाफेक करतानाची अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे.

ही गणेशमूर्ती १९ इंच म्हणजे साधारण दीड फूड उंच आहे. मूर्ती शाडू मातीतील असून दोन पायावर तोल सांभाळून भालाफेक करतानाची मूर्ती साकारणे आव्हानात्मक होते. डॉ. देशमुख यांच्या प्रेमळ आग्रहामुळे ही मूर्ती साकारताना विशेष आनंद झाला. ट्रॅक आणि फील्डमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजची मूर्ती साकारणे नक्कीच माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे, असे श्री. संसारे यांनी सांगितले.

डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी जाण्यासाठी डॉ. देशमुख यांचे मित्र राहुल औरंगाबाद यांच्याबरोबर ही गणेशमूर्ती आज रेल्वेने रवाना झाली. डॉ. देशमुख गेली १५ वर्षांहून अधिक काळ संसारे यांच्याकडून रत्नागिरीतून मूर्ती नेत आहेत. गणेशमूर्ती स्वरूप आरासही ते वैशिष्ट्यपूर्ण करतात.

आशीष संसारे रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांची गणेशमूर्तींची पिढीजात चित्रशाळा आहे. त्यांचे आजोबा रघुनाथ सखाराम संसारे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वडील अशोक संसारे, काका प्रभाकर संसारे यांनी सुरू ठेवली. त्यांचा वारसा आशीष संसारे सांभाळत आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply