आज शारदीय नवरात्राची सांगता झाली. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव नऊ दिवस देवींच्या भक्तीमध्ये रममाण होण्याचा.. हा उत्सव साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या प्रथा परंपरा वेगळ्या … भाषा, प्रांत , समाज याप्रमाणे त्या बदलतात. पण या सगळ्यामध्ये देवींची अनन्य भक्ती हा सारखा दुवा असतो. काय आहे नेमका नवरात्र उत्सव? तो का करायचा? गरबा खेळण्यासाठी ? नक्कीच नाही ना ? मग थोड्या तपशिलात जाऊन पाहू आणि यावर्षीचा उत्सव आपण कसा साजरा केला याचाही मागोवा घेऊ.
नवरात्रीचे विधी, पद्धत, हेतू आणि फल यामध्ये जाणण्यापूर्वी याबद्दल दोन पौराणिक कथा आहेत त्या पाहू.
महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वर मिळविला की विश्वातील कोणीही देव , दानव अथवा मनुष्य त्याला मारू शकणार नाही. हे वरदान मिळाल्यावर त्याने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. या दैत्याचा निःपात करण्यासाठी दुर्गादेवी शक्तीरूपात अवतरल्या. दुर्गादेवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस होऊन दहाव्या दिवशी देवींनी या दैत्याचा वध केला तो दिवस दसऱ्याचा!
प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी माता भगवतीची नऊ दिवस पूजा केली आणि त्यांच्या भक्तीने देवींनी रामचंद्रांना आशीर्वाद दिले . रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून लंकेवर विजय मिळवला, तो दिवस दसऱ्याचा!
शरद ऋतूमध्ये येणारे नवरात्र ते शारदीय नवरात्र. तंत्रमार्गातील शाक्तपंथीय ही उपासना प्रामुख्याने करतात. याचा संबंध शैव संप्रदायाशी येतो. शैव संप्रदाय हा शिवप्रधान असून शाक्त संप्रदाय हा शक्ती प्रधान आहे. त्यामुळे शक्ती ही या संप्रदायाची उपास्य देवता आहे. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होभन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. म्हणून शक्तीस्वरूप देवीची उपासना करण्याचा हा उत्सव. या शक्तिरूप देवतेची नऊ रूपे सांगितली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशी ती नऊ रूपे होत.
मुळात स्त्री देवता असल्यामुळे स्त्रीचा जो नैसर्गिक गुणधर्म म्हणजे नवनिर्मिती, सृजनाची शक्ती या सगळ्याचा विचार या उपासनेमध्ये केलेला दिसतो. घटस्थापना हेसुद्धा त्याचेच प्रतीक आहे. एका परडीत माती घेऊन त्यावर घट म्हणजे सुघड ठेवले जाते, त्या मातीत नऊ प्रकारची धान्ये पेरायची आणि त्या सुघडाची पूजा करायची, रोज नऊ दिवस नंदादीप प्रज्वलित ठेवायचा. याचा परिणाम म्हणून पूजा करतानाचे पाणी आणि शेजारी लावलेल्या नंदादीपाच्या प्रकाशाची उष्णता यामुळे त्या मातीतून अंकुर उगवतात. नऊ दिवसांनंतर उगवलेल्या या अंकुरामध्ये देवी स्वरूप सृजनाच्या शक्तीचे दर्शन घ्यायचे. कारण निर्मितीचा संबंध देवीशी आहे. याच दिवसांमध्ये साधारणपणे नवीन धान्य तयार होऊन घरी आणण्याचा काळ असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरीसुद्धा प्रसन्नता असते. मन प्रसन्न असताना केलेली भक्ती ही परमेश्वरापर्यंत नक्की पोचते.
भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म आणि आयुर्वेद यांचा जवळचा संबंध आहे. म्हणूनच या दिवसात पित्तविकाराचा नाश करण्यासाठी उपवास करायला सांगितले आहे. अर्थात आपल्याकडे तथाकथित खाल्ले जाणारे उपासाचे पदार्थ हे पित्त वाढवायलाच कारणीभूत ठरतात. परंतु हा अलीकडील बदल असू शकतो.
अशा प्रकारे त्या शक्तीस्वरूप देवतेची उपासना केल्यास मनःशांती मिळण्यास नक्की मदत होते, यात शंका नाही.
दुर्दैवाने अलीकडे नवरात्र हे फक्त गरबा किंवा दांडियापुरतेच सीमित होऊन राहिल्यामुळे या अशा गोष्टींचा एक तर विसर पडू लागला किंवा माहितीच झाल्या नाहीत. तेव्हा असे न करता त्यातील कार्यकारण भाव समजून घेऊन उपासना केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळेल.
आज नवरात्रीची सांगता होत असताना आपण यातील काय काय केले, याचा विचार करून जे न्यून राहिले असेल त्याच्या सिद्धतेसाठी संकल्प करू या आणि ज्याप्रमाणे देवींनी महिषासुराचा वध करून दुष्ट शक्ती संपवल्या, तशाच विजयादशमीच्या शुभदिनी आपल्यातील अमंगल विचारांचा त्याग करून एक संपन्न जीवन देव, देश आणि धर्मासाठी सार्थकी लागेल, असे करण्याचा संकल्प करू या.
- निबंध कानिटकर
(संपर्क : ९४२२३७६३२७)