रत्नागिरी : निसर्गसंपन्न कोकणात आता पावसाळ्यातील पूर आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई नित्याची झाली आहे. त्यावर कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) गावांनी यावर्षी मात तर केलीच, पण इतरांनाही तो आदर्श घेता यावा, यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नदीची पाठशाळा भरवायचे ठरवले आहे.
कोंडगाव आणि साखरपा या संगमेश्वर तालुक्यातल्या दोन गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असे. यावर्षीच्या पावसाळ्यात मात्र गावात पूर आला नाही. ग्रामस्थांची मेहनत, श्री दत्त देवस्थानचा पुढाकार आणि नाम फाउंडेशनची मदत यातून गावातली काजळी नदी स्वच्छ करण्यात आली. एक किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातून ६० मीटर रुंदीचा गाळ काढण्यात आला. याच वर्षी फेब्रुवारीपासून साडेतीन महिने हे काम चालले. त्याकरिता सुमारे ३५ लाखाचा खर्च आला. तो श्री दत्त देवस्थानने केला. त्याचा परिणाम पावसाळ्यात दिसून आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर आला, तरी दरवर्षी पुराचा वेढा बसणारी कोंडगाव-साखरपा गावे मात्र यावर्षी पुरापासून बचावली. ही किमया काजळी नदी संवर्धन प्रकल्पामुळे साधली गेली. पुण्यातील यशदा संस्थेचे माजी संचालक सुमन पांडे आणि डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेल्या या प्रकल्पाबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि पूर येणाऱ्या अनेक गावांमधून त्याबाबतची विचारणा झाली. त्यातूनच कोंडगावमध्ये येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी नदीची पाठशाळा भरणार आहे.
सामूहिक प्रयत्नातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. कोकणातील आणि देश-विदेशातील इतर गावांमध्येसुद्धा अशा प्रकारचे काम होण्याची गरज आहे. त्यासाठी हा उपक्रम श्री दत्त देवस्थानाच्या पुढाकाराने काजळी नदी संवर्धन प्रकल्प,गणेश मित्र मंडळ, बीड येथील मानवलोक संस्था यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

आपापल्या नदीला नेमका कशा प्रकारचा आजार झाला आहे आणि त्यावर उपाय कसा करायचा, याची शास्त्रीय बाजू आणि तंत्र उलगडवून दाखवणारी नदीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोंडगाव-साखरपा येथील कबनूरकर हॉलमध्ये ती होईल.कार्यशाळेत समग्र नदी या विषयावर डॉ. अजित गोखले, नदीचे भूशास्त्र विषयावर डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, पंचायती राज संस्था आणि लोकसहभाग, कामाचा आराखडा, नियोजन आणि योजनांचा समन्वय या विषयावर डॉ. सुमंत पांडे, वादळ, पूर, पाणीटंचाईची कारणे आणि अंदाज या विषयावर मयूरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत. नदीची जैवविविधता या विषयावर प्रा. माधव गाडगीळ, ‘आओ नदी को जाने’ विषयावर बोलण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंग यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून नाम फौंडेशनचे मल्हार पाटेकर उपस्थित राहणार आहेत.
ही शाळा सर्वांसाठी मुक्त असेल. समर्पण आणि सेवाभाव, प्रखर इच्छाशक्ती असणाऱ्यांना मुक्त प्रवेश असेल. नाममात्र १५१ रुपये शुल्क ९४२२६२७३८० या क्रमांकावर जीपेद्वारे पाठवावे किंवा निवड झालेल्यांनी २९ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणाच्या ठिकाणी रोख भरावेत. ज्या कोणाला या शाळेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी स्वतःचे नाव नोंदवावे. प्रथम येणाऱ्या चाळीस जणांनाच प्रवेश मिळणार आहे.
सेवावृती व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने ही शाळा चालवली जाणार आहे. साधा निवास आणि सात्त्विक भोजन व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये नदी अभ्यासाकरिता लागणाऱ्या प्रवासाची सोय असेल. प्रशिक्षकही कुठलेही मानधन न घेता प्रशिक्षण देणार आहेत. मनापासून, प्रत्यक्ष काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी या शाळेमध्ये सहभागी व्हावे आणि प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि संपर्कासाठी श्रीधर कबनूरकर दूरध्वनी क्रमांक ९४२२६२७३८०, चैतन्य सरदेशपांडे कोंडगाव साखरपा ९१३०३७६७१०, मुग्धा सरदेशपांडे 9270246901 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीकरिता
https://docs.google.com/forms/d/1Lu-MpJuHo-EyE2Nr7zPgUlaXrD6zaqDky7lOND8tcdY/viewform?ts=616fbef3&edit_requested=true
हा गुगल फॉर्म भरण्याची सूचना करण्यात आली आहे.