`आविष्कार`मधील मुलांच्या आविष्काराला हवी खरेदीची दाद

रत्नागिरी : येथील आविष्कार मतिमंदांच्या संस्थेतील मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करून त्यांच्या आविष्काराला दाद द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. येत्या २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात या वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत भरणार आहे.

आविष्कार मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत संस्था संचालित शामराव भिडे कार्यशाळा गेली २८ वर्षे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण देत आहे. वयाच्या अठरा वर्षांच्या पुढील विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. ते घेत असताना तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यात येते. त्यातून येणारा नफा विद्यार्थ्यांना नफा वितरित करण्यात येतो. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात हस्तकलेतून वस्तू तयार केल्या जातात. गेले काही महिने सुरू असलेल्या करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमध्ये सर्व विद्यार्थी आपापल्या घरीच आहेत. परंतु या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. होम बेस्ड अॅक्टिव्हिटी हा त्याचाच एक भाग आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाकरिता लागणारा कच्चा माल पुरवून त्यातून वस्तू निर्मिती केली जाते. काही विद्यार्थी त्या त्या वस्तूचा एकेक भाग तयार करतात. या सर्व भागांचे एकत्रीकरण करून कार्यशाळेमध्ये वस्तू तयार होते. कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निदेशक त्यांना मार्गदर्शन करत आहेत. सध्या या वस्तू आविष्कार संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेत विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

या वस्तूंची विक्री स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्रदर्शनाच्या आणि विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. या विक्री केंद्रावर विद्यार्थी स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्री करतात. याहीवर्षी हे विद्यार्थी या विक्री केंद्रामध्ये कार्यरत असतील. खास दिवाळीकरिता रंगीबेरंगी पणत्या, आकाश कंदील, सुगंधी उटणे, लहान लहान आकाशकंदील, रंगीबिरंगी मेणबत्त्या, पर्सेस, प्रेझेंट पाकिटे, भेट देण्यासाठी दिवाळी किट अशा प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. (बातमीच्या शेवटी या वस्तूंची छायाचित्रे आहेत.)

येत्या २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत सावरकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचा स्टॉल उभारला जाणार आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आविष्कार मतिमंदांच्या संस्थेतील मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करून त्यांच्या आविष्काराला दाद द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बिपिन शहा, सचिव सौ. संपदा जोशी, समिती अध्यक्ष नितीन कानविंदे, व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply