रत्नागिरी : शाळा, महाविद्यालये आता हळूहळू सुरू झाली आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निसर्गात जाऊन अभ्यास करण्याची संधी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सुमारे सहा एकरवर वसलेल्या आसमंतच्या जैवविविधता उद्यानात विद्यार्थ्यांना पूर्वपरवानगीने अभ्यास करता येईल.
यासंदर्भात आसमंतचे प्रमुख आणि प्रथितयश उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले की, आसमंत फाउंडेशन अनेक वर्षांपासून शास्त्रीय संगीत प्रसार, विद्यार्थ्यभिमुख उपक्रम आणि निसर्गसंवर्धन असे उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. निसर्गसंवर्धनासाठी आसमंत संस्थेने ‘जैवविविधता उद्यान’ प्रकल्प हाती घेतला. तेथे २०१६ मध्ये वृक्ष लागवड केली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या ३०५ देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जात आहे. त्यात सीता, अशोक, अर्जुन, बेल, रुद्राक्ष, पिंपळ, वड, औदुंबर, कडुनिंब, काटेसावर, अडुळसा, सुरंगी, भारंगी, ऐन, खैर, शिसम, साग, भेला, पळस, आवळा, सात्वीण, चिकू, काजू, बदम, बर्डचेरी, केगेलिया, पारिजातक, सोनचाफा, धायटी, फाफट, कुसुम, अंजन, भोकर, वारस, कुकर, तिरफळ, बिब्बा, मेधशिंगी, नेवेरे, बेहेडा, कांचन, अगस्ता, बहावा अशी झाडे आहेत. येथे विविध कीटक, पक्षी यावेत, त्यांचा अधिवास वाढावा आणि त्यातून निसर्गाचा समतोल राखण्यास हातभार लागावा हा हेतू आहे.
या उद्यानात निसर्ग अभ्यासासह पक्षी, प्राणी निरीक्षणही करता येईल. येथे लावलेल्या विविध देशी झाडाझुडपांमध्ये विविध प्रकारची फुलपाखरे पाहण्याचा आनंद घेता येईल. या ठिकाणी स्पॉटेड कबूतर, रेड व्हिस्केर्ड बुलबुल, व्हाइट ब्राऊन बुलबुल, ओरिएंटल मॅगपी रॉबिन, जांभळा सनबर्ड, फॅन्टाईल फ्लाय कॅचर, जांभळा सनबर्ड, टिकलेचा फ्लाय कॅचर, टेलर बर्ड, किंगफिशर आणि वुडपेकर असे अनेक पक्षी पाहायला मिळतात. मधमाश्या, ड्रॅगनफ्लाय आणि फुलपाखरे यांच्या विविध प्रजातीदेखील आहेत.
उद्यानाच्या अधिक माहिती आणि उद्यानाच्या सफरीसाठी नंदकुमार पटवर्धन (99700 56523) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media