लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि इतर समविचारी संघटनांनी केली आहे. त्याकरिता आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती रत्नागिरीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये आणि संजय जोशी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी श्री. जोशी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले, गणेशोत्सव, शिवजयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला गतिमान करणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रत्नागिरीत ‘उर्दू भवन’च्या ऐवजी ‘लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक’ निर्मिण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने अनेक राष्ट्रपुरुष आणि क्रांतिकारकांसंदर्भात उपेक्षा होताना आढळते. टिळकांचे जन्मस्थान त्यापैकीच एक आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या जन्मस्थानाची दुरवस्था झाली आहे. छपराची कौले फुटली आहेत, भिंतींवर शेवाळ धरले आहे. काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. पुरातत्त्व खात्याने जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेला फलक गंजला असून तो नीट वाचताही येत नाही. लोकमान्य टिळकांचा पुतळा आणि मेघडंबरीची दुरवस्था झाली असून पुतळ्याचा रंग काही ठिकाणी उडाला आहे. स्मारकाच्या छपरावरील कौलांवर गवत वाढले आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यात पाणी गळून ही ऐतिहासिक वास्तू आणि या वास्तूत जतन केलेला अनमोल ठेवा खराब होण्याची शक्यता आहे. मेघडंबरीच्या खांबांना लावलेल्या फरशांमध्ये भेगा पडल्या आहेत. मेघडंबरीवरील अर्धगोलाकार छताचा रंग उडाला आहे. मेघडंबरीच्या उद्घाटनाचा फलक खराब झाला असून तो नीट वाचता येत नाही. मेघडंबरीच्या मागे टिळकांची शिल्पाकृती तुटलेल्या स्थितीत आहे. स्मारकाला भेट द्यायला देशभरातून शेकडो पर्यटक, शाळांच्या सहली येत असतात. त्यांच्यकरिता स्मारकाची माहिती पुस्तिका उपलब्ध नाही. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. वाहनतळाची (पार्किंगची) व्यवस्था नाही, अशा अनेक गोष्टींचा तेथे अभाव आहे. पर्यटकांना मोडलेले-तुटलेले आणि भग्नावस्थेतील जन्मस्थान पाहावे लागत आहे.

श्री. खाड्ये म्हणाले, या स्मारकाची राज्य अथवा केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने पाहणी केली आहे का, असे माहिती अधिकारात विचारले असता नकारार्थी उत्तर देण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत अशी पाहणी झालेली नाही. यावरून केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्याची स्मारकाबाबतची अनास्थाच दिसते.

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करण्यात यावे. तसेच ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. टिळकांचा जीवनपट दाखवण्याची व्यवस्था करावी. जन्मस्थानाची माहिती पुस्तिका आणि लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या प्रती, टिळकांची दुर्मिळ छायाचित्रे इत्यादी साहित्य येथे ठेवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

शासनाची याबाबतची अनास्था आणि दुर्लक्षाकडे वेधण्यासाठी जनआंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्याकरिता सुरुवातीला समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात येणार असून ट्विटरवरून उद्याच संदेश पाठविले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी नव्याने बदली होऊन आले की, प्रत्येक वेळी त्यांची दालने आणि निवासस्थाने यांच्यावर लक्षावधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लोकमान्य टिळकांसारख्या स्वातंत्रलढ्याच्या अग्रणी नेत्याच्या स्मारकाकरिता निधी उपलब्ध करून दिला जात नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्मारकाच्या दुरुस्तीसाठी साडेचार लाखाच्या निधीची घोषणा केली होती. त्या निधीचे काय झाले हे समजले नाही आणि दुरुस्तीही झाली नाही, याबाबतही खेद व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थानातील वास्तू, वस्तू आणि परिसराची दुरवस्था

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply