रत्नागिरीत २४ जणांनी घेतले सहल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानने प्रथमच आयोजित केलेल्या ट्रॅव्हल, टुरिझम गाइड ट्रेनिंग म्हणजेच सहल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण २४ जणांनी घेतले. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मदतीने शांतीनगर येथील कार्यालयात दहा दिवसांचे हे प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षण शिबिराचा समारोप पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या उपस्थितीत झाला. कोकणातील पर्यटनवाढीला हातभार लावण्यासाठी रत्नागिरीमध्ये सहल मार्गदर्शक तयार झाले आहेत. त्यामुळे अनुभवसिद्ध पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. आता वर्षअखेरीस रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शक उपलब्ध झाल्याने पर्यटनाचा आनंद अधिक चांगल्या रीतीने घेता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावातून प्रत्येकाने आपल्या गावातील येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा पर्यटन संचालनालयाला पाठवल्यास त्या सुविधा उपलब्ध करून देता येतील अशी ग्वाही श्री. हेडे यांनी यावेळी दिली.

हॉटेल व्यावसायिक बबनराव पटवर्धन यांनी प्रशिक्षणार्थींना गाइड या विषयावर मार्गदर्शन केले. हा व्यवसाय कोकणच्या पर्यटनवाढीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंक ऑफ इंडियाचे उपआंचलिक प्रबंधक किशोरचंद कंदी यांनी गाइड हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होऊ शकेल, याबाबत मार्गदर्शन केले.

पर्यटन व्यवसायातील नवनवीन संकल्पना, व्यावसायिक आणि त्यांचे अनुभव यावेळी प्रशिक्षणार्थींना मिळाले. पर्यटन मार्गदर्शक या व्यवसायात आल्यानंतर आवश्यक बाबी, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनासाठी पर्यटन मार्गदर्शकाची भूमिका याबद्दलही प्रशिक्षण देण्यात आले. पर्यटन विश्वात घडणाऱ्या घटना, जागतिक पर्यटन दिनाबाबत विस्तृत माहिती दिली. पर्यटन व्यवसायासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास, ६५ पर्यटनस्थळांची माहिती आणि रत्नागिरी जिल्हा आणि कोकणच्या पर्यटन सहलीचे आयोजन याबद्दल निसर्ग टुरिझमचे संजय नाईक आणि श्वेता नाईक यांनी प्रशिक्षण दिले.

कोकणातील पर्यटन व्यवसाय दिवसेंदिवस बहरतो आहे. समुद्र पर्यटन आणि जलक्रीडा, जैवविविधता, किल्ले, इतिहास, प्राची मंदिरे, खाद्य संस्कृती अशी अनेक पर्याय आता पर्यटकांसाठी उपलब्ध होत आहेत. कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण, साहस पर्यटनामध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग याचप्रमाणे पक्षी निरीक्षण असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या नावीन्यपूर्ण पर्यटनात सहल मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची असून भविष्यात खूप पर्यटन वाढीसाठी फायदा होईल, असे सुधीर रिसबूड यांनी सांगितले. रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, कोकण जैवविविधता, आडवळणावरचे कोकण आणि कातळशिल्प याबाबत सुधीर रिसबूड, अॅडव्हेंचर पर्यटनाबाबत धीरज पाटकर, मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, हॉटेल सी फॅनचे सुहास ठाकूरदेसाई आणि कृषी पर्यटन उद्योजक गणेश रानडे यांनी मार्गदर्शन केले.

शिबिराकरिता सुहास ठाकूरदेसाई, सुधीर रिसबूड, गणपतीपुळे पर्यटन संस्थेचे प्रमोद केळकर, सुबोध साळवी, वैभव सरदेसाई यांनी सहकार्य केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संचालक दर्शन कानसे, प्रशिक्षक देवेंद्र सांबरे, प्रसाद कांबळे, प्रसाद शिंदे, ऐश्वर्या पिलणकर, विदिशा गावखडकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply