रत्नागिरी : पाच दिवसांच्या पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षणाला रत्नागिरीत प्रारंभ झाला आहे. हॉटेल सी फॅन्स येथे सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी केले. या प्रशिक्षणामुळे रत्नागिरी परिसरात ३२ गाइड तयार होणार आहेत.
पर्यटन क्षेत्रात तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य पर्यटन संचालनालयाच्या कोकण प्रादेशिक कार्यालयातर्फे पाच दिवसांचे हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. ते येत्या १८ मार्चपर्यंत चालणार आहे. उद्घाटन प्रसंगी श्री. कीर म्हणाले की रत्नागिरी भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख करून घ्यावी. ईश्वराने कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे. या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे. गाइड आणि हॉटेल यांनी एकमेकांशी समन्वय साधून या परिसरात असलेल्या हॉटेल्सना व्हिजिटिंग कार्ड पाठवून चांगला संपर्क ठेवावा. पर्यटकांची गाइडची मागणी पूर्ण करावी. परिसरातील पर्यटनस्थळांची, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती गोळा करून आणि बोलण्यामध्ये भाषेचा चांगला वापर करून पर्यटनस्थळाला बोलके करावे. उत्कृष्ट गाइड तयार व्हावेत.
पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे म्हणाले की, स्थानिक युवकांना पर्यटक गाइड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. पर्यटनस्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती गाइड देत असतो. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून हे प्रशिक्षण घ्यावे आणि आलेल्या संधीचा उपयोग करून घ्यावा. पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे, असे श्री. हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई यांनी सांगितले.
यावेळी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, ग्वाल्हेर आयआयटीटीएमचे डॉ. चंद्रशेखर बरुआ, हॉटेल सीफॅनचे संचालक सुहास ठाकूरदेसाई, कातळशिल्पाचे अभ्यासक सुधीर रिसबूड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड