वेदमूर्ती आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांनी आयोजित केला विशेष कार्यक्रम

रत्नागिरी : वेद आणि शास्त्र या विषयातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत नुकतेच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी वे. मू. कै. विनायक सीताराम आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फाल्गुन शुद्ध चतुर्थी ते फाल्गुन शुद्ध अष्टमी शके १९४३ (६ मार्च ते १० मार्च २०२२) या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कालावधीत दररोज सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशी गुरुजी यांच्या वाणीतून ऋग्वेद शाकलसंहिता पारायण आठल्ये गुरुजींच्या घरी करण्यात आले. या कालावधीत दररोज दुपारी साडेतीन ते रात्री आठ या वेळेत आळंदीतील वेदमूर्ती अनंतशास्त्री मुळ्ये यांनी ‘दत्तपुराण’ या विषयावर आपल्या अमृतवाणीने केलेले निरूपण भाविकांना ऐकता आले. निरूपणाचा हा कार्यक्रम रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत झाला.

१० मार्च रोजी सायंकाळी पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती दत्तात्रेय पांडुरंग नवाथे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि मानधन देऊन सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई यांनी केले. सत्कार समारंभाला वेदमूर्ती प्रभाकर जोगळेकर गुरुजी, वेदमूर्ती गणेश साळस्कर गुरुजी, विनायक पोखरणकर शास्त्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्री यांच्या माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष होते. या दोन्ही दिग्गज गुरूंच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही; मात्र पुढील वर्षीपर्यंत सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःहून संपर्क साधून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रम समितीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरीतील झाडगाव रस्त्यावरील संस्कृत पाठशाळेत संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

संपर्क : ओंकार पाध्ये – 9850666586/9699005042; धनंजय नवाथे – 9561820701

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply